पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरु असलेले चक्काजाम आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. ऊस दर आंदोलनाची ही कोंडी फुटल्याने महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि. २३) झालेल्या झालेल्या बैठकीत मागील हंगामातील १०० रुपये आणि पुढील हंगामातील १०० रुपये प्रमाणे कारखानदारांनी मागणी मान्य केली असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले. राजू शेट्टी यांच्या मागणीला अखेर यश आल्याने घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तोडगा निघाला आहे आता सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी लवकरात लवकर मार्ग काढायचा असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले.
गत हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता किमान शंभर रुपये मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (दि. २३) पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. पंचगंगा नदी पूल परिसरातील दर्ग्याजवळ चक्काजाम आंदोलन केले. दुसऱ्या हप्तबाबत साखर कारखानदार जोपर्यंत सकारात्मक निर्णय घेत नाहीत तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून उठणार नसल्याची आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठेवली होती. आज या ऊस दराची कोंडी फुटल्यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.