Latest

T20 World Cup : ‘मॅच हमारे हाथ में था, लेकीन…’, पाकिस्तानी चाहत्यांचा राग अनावर

Shambhuraj Pachindre

T20 World Cup : टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपूर्वी पाकिस्तानने एकही सामना गमावला नव्हता. मात्र, ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत त्यांच्या विजयी मोहिमेला 'ब्रेक' लावला आणि पाकिस्तानचे टी-20 विश्‍वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. सामना पाकिस्तानच्या अवाक्यात असताना सामन्याच्या 19 व्या षटकात मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता. हा सामन्याचा 'टर्निंग पॉईंट' ठरला. येथेच सामना पाकच्या हातून निसटला. त्यानंतर वेडने सलग 3 षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून चाहते हसन अलीवर पराभवाचे खापर फोडत आहेत. 'मॅच हमारे हाथ में था, लेकीन हसन अलीने बेडा गर्क कर दिया…' असा त्यांचा आरोप आहे. सोशल मीडिया, टीव्हीवर चाहत्यांनी हसन अलीला खलनायक ठरवले आहे.

सामना पाहून निराश मनाने स्टेडियममधून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर निराशा, दु:ख दिसत होते. प्रत्येकजण या पराभवाला हसन अलीला जबाबदार धरत होता. 'हसन अलीने झेल सोडला नसता तर आज आम्ही फायनलमध्ये असतो,' असे एका प्रेक्षकाने सांगितले. त्याचवेळी तेथे उपस्थित असणार्‍या दुसर्‍या चाहत्याचा संताप अनावर झाला होता. हसन अलीचे खेळापेक्षा आपल्या केसांवर जास्त प्रेम आहे. असे खेळाडू बोर्डाने निवडलेच कशाला अशी विचारणा त्याने केली.

चिमुरडा फॅन फोडणार होता टीव्ही

कराची : पाकिस्तानच्या पराभवानंतर एका चिमुरड्याला अश्रू अनावर झाले. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सामना गमावल्यानंतर तो अक्षरश: ओक्साबोक्शी रडू लागला. रागाच्या भरात चिमुरडा टीव्हीवर फटका मारणारच होता; पण त्याला त्याच्या वडिलांनी रोखले. त्यानंतरही तो खूप रडतच होता.

T20 World Cup : पराभवास एकट्याला जबाबदार धरू नका : बाबर

कर्णधार बाबर आझमने पराभवाचे खापर कोणत्याही एका खेळाडूवर न टाकण्याची सूचना दिली आहे. ड्रेसिंग रूममध्ये बोलताना तो म्हणाला, दु:ख आपल्या सर्वांचे आहे, आपण काय चूक केली, कुठे चुकलो, कोणीही एकमेकांना सांगणार नाही. संपूर्ण संघ खराब खेळला. म्हणूनच कोणीही कोणाकडे बोट दाखवणार नाही आणि कोणी असे करताना मी पाहिले किंवा ऐकले तर चांगले होणार नाही. मी त्याच्या विरोधात कसा जाईन हे सांगायची गरज नाही. यावेळी हसन अली आपला चेहरा दोन्ही हाताने झाकून बसला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT