वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवरायांचे राजपरिवारासह 25 वर्षे वास्तव्य असलेल्या तसेच हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरील गाडलेल्या तटभिंतीचे उत्खनन करण्यात येणार आहे. गडाच्या पद्मावती माचीवरील तटभिंतीचे मूळ ऐतिहासिक स्वरूपात जतन करण्यासाठी तसेच पाली दरवाजा मार्गाच्या पायर्या व इतर ऐतिहासिक वास्तूंच्या डागडुजीसाठी 7 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. यामुळे छत्रपती शिवरायांच्या अप्रकाशित इतिहासाचे पुन्हा दर्शन घडणार आहे.
छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वांत अभेद्य व बळकट डोंगरी किल्ला म्हणून राजगडाला जगभरात लौकिक आहे. शिवकालीन उत्कृष्ट बांधकामाची साक्ष देत राजगड उभा आहे. गडाच्या उत्खननात लुप्त झालेल्या अभेय्य तटभिंतीसह सुरक्षा चौक्या, सैन्यनिवास, राजसदरेखालील तळघर आदी वास्तू, ठिकाणे उजेडात आली आहेत. शेकडो वर्षे दगड-मातीत गाडलेल्या गडाच्या तटभिंतीचे दर्शन पाच वर्षांपूर्वी डागडुजीचे काम करताना झाले होते. त्यानंतर आता पुन्हा पद्मावती माचीवरील तळ्यापासून चोर दरवाजापर्यंत तसेच पुढील तटभिंतीच्या डागडुजीचे काम करण्यात येणार आहे.
राजगडाची डागडुजी व विकासकामांसाठी शासनाने 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून पद्मावती माचीवरील उर्वरित तटभिंतीची डागडुजी केली जाणार आहे. तसेच पाली दरवाजा मार्गावरील पायर्यांची दुरुस्ती व इतर कामे करण्यात येणार आहेत. याबाबत प्रशासकीय बाबी अंतिम टप्प्यात असून, लवकरच कामे सुरू होतील.
डॉ. विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व विभाग शिवकालीन सुसज्ज शहर शिवपट्टण
राजगडाच्या पायथ्याच्या पाल खुर्द (ता. वेल्हे) येथील शिवपट्टण परिसरातील उत्खननात सापडलेल्या छत्रपती शिवरायांच्या भव्य राजवाड्याची शिवकालीन बांधकाम शैलीत पुन्हा उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. छत्रपती शिवरायांनी शिवपट्टण नावाचे सुसज्ज शहर गडाच्या पायथ्याला वसविले होते. राजगडावरील बांधकाम शैलीप्रमाणे उत्खननात सापडलेल्या शिवकालीन भांडी, नाणी, राजवाडा, स्मृतिस्थळ, संग्रहालय आदी वास्तूंची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी पुरातत्व खात्याने प्रकल्प विकास आराखडा तयार केला आहे.