Latest

अहमदनगर जिल्ह्यात सातवाहन ते मध्ययुगीन वसाहतीचे सापडले पुरावे, राज्यातील पाहिलेच उत्खनन

अमृता चौगुले

दिनेश गुप्ता

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील कोटुल गावात सातवाहन कालखंडातील वसाहतीचे पुरावे सापडले असून, पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाने तेथील मुळा नदीपात्रात उत्खनन सुरू केले आहे. या उत्खननात ऐतिहासिक ते मध्ययुगीन काळातील व शेवटच्या युगातील मानवी संस्कृती-राहणीमान दर्शविणारे पुरावे सापडल्याची माहिती पुरातत्व विभागाचे प्रमुख डॉ. पांडुरंग साबळे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली.

केंद्रीय पुरातत्व विभागाकडून उत्खननाची नुकतीच परवानगी-लायसेन्स डॉ. साबळे यांच्या नावाने दिली. सातवाहनकाळातील मानवी संस्कृती, परंपरा आणि राहणीमानाचा पुरावा अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील कोटुल गावात असल्याचे संशोधन 2010 मध्ये केले होते. मात्र, उत्खननाचा परवाना (लायसेन्स) केंद्रीय पुरातत्व विभागाकडून न मिळाल्याने ते करता येत नव्हते. ती परवानगी मिळताच डॉ. साबळे यांनी 26 एप्रिलपासून मुळा नदीच्या खोर्‍यात म्हणजेच सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सर्वांत उंच असलेल्या कळसूबाई शिखरावरून येणार्‍या मुळा नदीच्या खोर्‍यात उत्खनन सुरू केले.

सातवाहनकालीन बाजारपेठा सापडल्या…

सातवाहनकालीन सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या कोतुल गावातील लोक लेण्याद्री पायवाट-खिंडीमार्गे नालासोपारा-कल्याणपर्यंत माल पोहचवत होते. वर्षभरापूर्वी केलेल्या संशोधनात पुरावे सापडले होते. त्यावर तीन दिवसांपासून असलेल्या उत्खननावर शिक्कमोर्तब झाले आहे. सातवाहनकालीन बाजारपेठ रांगा सातारा केव्हज, शिरवळ, पुण्याच्या बाजूला असलेल्या लोणावळ्याजवळ व जुन्नरजवळील कोतुल होती. या सर्व बाबींचा उल्लेख उत्खननात सापडला असून, त्या वेळची भांडी, बाजारपेठेच्या खुणा व अन्य काही महत्त्वाच्या बाबी हाती लागल्या आहेत.

भांडी अन् जनावरांचे गोठेही सापडले…

सातवाहन ते मध्ययुगीन काळातील वस्तूंचे नमुने भूगर्भाच्या विविध थरांत सापडले आहेत. यामध्ये विशेषत: मातीचे मनी, काचेचे मनी, समुद्राच्या शिंपल्यापासून बनविलेल्या छोट्या व मोठ्या प्रकारच्या बांगड्या, खापराची भांडी, विटा व धान्य साठविण्यासाठी तयार केलेले रांजण, जनावरांचा गोठा, जेवण बनविण्याच्या चुलींसह विविध वस्तू उत्खननात सापडल्या आहेत. उत्खननाचे काम मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत चालणार आहे. इतिहासप्रेमी, संशोधक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्यक्ष अनुभव घेता येऊ शकतो.

उत्खननात सातवाहनकाळातील बाजारपेठ आणि त्या गावात राहणार्‍या लोकांचे राहणीमान दर्शविणारे पुरावे सापडत आहेत. राज्यातील असे पाहिले उत्खनन आहे. हाती लागलेल्या वस्तूंचा अभ्यास केला जात आहे.

   – डॉ. पांडुरंग साबळे, विभागप्रमुख, पुरातत्व विभाग, डेक्कन कॉलेज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT