पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात भाजपचा मनमानी कारभार सुरू आहे. लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आज अरविंद केजरीवाल व भगवंत मान यांच्यासह आप नेत्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केजरीवाल हे दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले आहेत. काही लोक राजकार करतात पण आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं जपत असतो. नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. देशात लोकशाही वाचवण्याची गरज आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय केंद्रातील सरकार मानत नाही. सरकार येताच केंद्राने आमचे सर्व अधिकार हिरावून घेतले. कोर्टावर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका केली जाते. या सरकारला अहंकार झाला आहे. या अहंकार आणि स्वार्थी माणूस देश चालवू शकणार नाही. आमदार फोडून देशभरातील विरोधी सरकार पाडण्याचा मोदी सरकारचा धंदा आहे. ईडी आणि सीबीआयचा वापर करून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्लीमध्येही आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारच्या याच हुकुमशाही विरोधात आमचा लढा आहे. हा लढा आम्ही अखेरपर्यंत लढू. २०२४ मध्ये मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.
भाजप आणि संघाच देशाच्या स्वातंत्र लढ्यात योगदान नाही. भाजपला देशभरात पराभवाची भीती आहे. मोदींविरोधात लोकांनी एकजूट होऊन लढण्याची गरज आहे. २०२४ ला मोदी सत्तेत आल्यास संविधान बदलतील. त्यामुळे लोकशाहीला वाचविण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे भगवंत मान यांनी म्हटले आहे.