पुढारी ऑनलाईन डेस्क : कमाल रशीद खान (KRK) याला 30 ऑगस्ट रोजी आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल पोलिसांनी अटक केली होती. काही दिवसांनंतर, त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि लैंगिक शोषणाच्या आणखी एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर केआरके नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे. बाहेर येताच त्याने धक्कादायक दावा केला आहे. तुरुंगात केवळ पाणी पिऊन 10 दिवस राहिल्याचे त्याने म्हटले आहे.
केआरकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर आपले विधान शेअर केले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'मी 10 दिवस तुरुंगात फक्त पाणी पिऊन जगलो. त्यामुळे माझे वजन 10 किलो कमी झाले आहे', असे त्याने म्हटले. त्याचे ट्विट समोर आल्यापासून लोक सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यांच्या या वक्तव्याची अनेकांनी खिल्लीही उडवली आहे.
केआरकेला त्याच्या वक्तव्यामुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. एका ट्विटर युजरने कमेंट करत म्हटलंय की, 'वैद्यकशास्त्राच्या दृष्टीकोनातून हे कसे शक्य आहे? 10 दिवस पाणी पिऊनही माणूस 10 किलो वजन कमी करू शकत नाही.' तर एका यूजरने मजेशीर टोनमध्ये 'बाकी जे 8 किलो शिल्लक राहिले आहे ते सांभाळून ठेवा. घाबरू नका कमाल सर', असा खोचक टोला लगावला आहे.
जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरकेचे हे पहिले ट्विट नाही. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या शत्रूंचा बदला घेण्याबाबत एक ट्विट केले होते. मात्र, नंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. यानंतर केआरके याने त्याच्या नवीन ट्विटमध्ये म्हटले की, मला कोणाचाही बदला घेण्याची गरज नाही. माझ्यासोबत जे काही वाईट झालं, ते मी विसरलोय, असं त्याने स्पष्ट केले होते.
दिवंगत अभिनेते ऋषी कपूर, इरफान खान आणि चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्यासह सेलिब्रिटींविरोधात ट्विट केल्याबद्दल केआरकेला पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण 2020 मध्ये केआरकेने केलेल्या आक्षेपार्ह ट्विटच्या संदर्भात होते. त्यानंतर 2019 च्या लैंगिक शोषण प्रकरणात वर्सोवा पोलिसांनी त्याला अटक केली. महिलेचा हात पकडून लैंगिक इच्छा व्यक्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
केआरकेने '1920: लंडन'साठी दिग्दर्शक विक्रम भट्टविरोधातही अनेक आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या होत्या. यानंतर विक्रमने त्याच्यावर मानहानीचा दावा केला होता. केआरकेने दावा केला होता की करण जोहरने त्याला 'बॉम्बे वेल्वेट'चा रिह्यू करण्यासाठी पैसे देऊ केले होते. नंतर अनुराग कश्यपने या गोष्टींचा इन्कार केला. केआरकेच्या एंटरटेनमेंट वेबसाईटनेही अनुरागच्या मृत्यूची अफवा पसरवली होती. त्याबद्दल त्यांनी या प्रकाराबाबत माफी मागून त्या प्रकरणावर पडदा टाकला होता.