Latest

निवृत्तीनंतरही अभियंत्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय राहावे : डॉ. प्रतापसिंह जाधव

Arun Patil

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : देशविकासात अभियंत्यांचे मोठे योगदान आहे. अभियंत्यांनी निवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात सक्रिय राहावे, असे आवाहन दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले.

फोरम ऑफ रिटायर्ड डिप्लोमा इंजिनिअर्सच्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेेचे राज्य अध्यक्ष रमेश जकातदार होते. येथील शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.

डॉ. जाधव म्हणाले, समाजकारण करण्यासाठी कोणत्या पक्षाची अथवा पदाची गरज नसते, तर त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. कोणतेही काम करताना वयापेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आपण निवृत्त झालो आहोत, असे न म्हणता, उलट जोमाने कामाला लागले पाहिजे. निवृत्त अभियंत्यांचे राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठका घ्या. जरुर तेथे मी स्वत: मदत करीन. जे प्रश्न कोणाकडूनही सुटणार नाहीत, ते माझ्याकडे आणा; कारण तसे काम करण्यात मला आनंद वाटतो.

डॉ. जाधव म्हणाले, दै. 'पुढारी'च्या माध्यमातून सियाचीन हॉस्पिटल असो अथवा अन्य विविध कामे, सामाजिक बांधिलकी म्हणून केली आहेत; कारण समाजकारण करण्यासाठी कोणत्या पक्षाची अथवा पदाची गरज नसते किंवा राजकारणात जाण्याची आवश्यकता नाही. केवळ इच्छाशक्ती असेल तर हे काम मार्गी लावता येते. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान सतत बदलत असते. निवृत्त अभियंत्यांनी अशा बदलत्या तंत्रज्ञानाशी एकरूप होऊन कार्यरत राहिले पाहिजे. डॉक्टर, शेतकरी, सैनिक आणि अभियंता यांचे देशविकासात मोठे योगदान आहे.

शिवशंकर दुबे म्हणाले, राजकीय व्यक्तीपेक्षा वृत्तपत्राच्या संपादकांना निमंत्रित करून त्यांच्यासमोर संघटनेच्या समस्या मांडल्या, हे चांगले काम केले आहे. अभियंता असलो तरी आपण सामाजिक कामही करू शकतो. एकमेकांची सेवा आणि मदत करण्याची भावना ठेवली पाहिजे. त्यातून सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

विनोद वाघ यांनी कनिष्ठ अभियंत्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत विवेचन केले. कार्यक्रमास एन. एस. खेबुडे, विनोद वाघ, मसइउद्दीन सय्यद, मनमोहन राजवंशी, आर. सी. श्रीवास्तव, प्रकाश घुणकीकर, एस. आर. पाटील, रोहित बांदिवडेकर, रमेश जकातदार, एम. आर. नालंग, शिवाजीराव नांदगावकर, दिलीप कल्याणकर, बी. एम. उगले आदी उपस्थित होते.

यावेळी विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. आगामी काळासाठी संघटनेचे पदाधिकारी निवडण्यात आले. डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. एम. आर. नालंग यांनी प्रास्ताविक केले. वसंत तोंदले यांनी सुत्रसंचालन केले.

सामाजिक भावनेतून सियाचीनमध्ये हॉस्पिटल उभारणी

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सामाजिक भावनेतून सियाचीनमध्ये मोठे हॉस्पिटल उभारून पवित्र काम केले आहे. डॉ. जाधव हे छोट्या मनाचे अथवा छोट्या हृदयाचे नाहीत. त्यांचे मन आणि हृदय मोठे आहे, अशा शब्दांत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवशंकर दुबे यांनी मुक्तकंठाने डॉ. जाधव यांचा गौरव केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT