नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संरक्षण, स्वच्छ इंधन तसेच अंतराळ क्षेत्रातील तंत्रज्ञान सहकार्य वाढविण्याचा निर्धार भारत-अमेरिका यांनी केला आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लाॅईड ऑस्टिन यांची भेट घेत चर्चा केली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत देशातच जास्तीत जास्त संरक्षण साहित्याची निर्मिती करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाची देशाला गरज आहे. सध्या भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्याची खरेदी करतो. मुक्त आणि सुरक्षित भारत-पॅसिफिक क्षेत्रासाठी अमेरिका सध्या जगभरात लॉबिंग करीत आहे. चीनपासूनचा वाढता धोका लक्षात घेऊन अमेरिकेने या मोहिमेत पुढाकार घेतला आहे. या मुद्यावरही सिंग आणि ऑस्टिन यांच्या दरम्यान चर्चा झाल्याचे समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 22 तारखेपासून अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी ऑस्टिन यांचा दौरा होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावेळी भारत आणि अमेरिकेदरम्यान संरक्षण करार होण्याची शक्यता आहे. अति उंचीवर उपयोगात येणाऱ्या विनामाणूस टेहेळणी विमानांच्या खरेदीचा सौदा या दौऱ्यावेळी होऊ शकतो. जनरल आॅटोमिक एरोनाॅटिकल्स सिसि्टम्सकडून अशा प्रकारची 18 विमाने खरेदी केली जाऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. भारत आणि चीन सीमेवर टेहेळणी करण्यासाठी भारताला अशा प्रकारच्या विमानांची गरज आहे.
हेही वाचा