नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Electronic Devices : लॅपटॉप, टॅबलेट, अल्ट्रा स्मॉल फॅक्टर कॉम्प्युटर्स, सर्व्हर्स तसेच पर्सनल कॉम्प्युटर्सच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. वरील वस्तू एचएसएन- 8741 श्रेणीत येत असल्याने त्यावर निर्बंध घातले जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
वरील वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले असले तरी 20 वस्तूंच्या प्रत्येक व्यवहाराला काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. संशोधन आणि विकास, टेस्टिंग, बेंचमार्किंग, इव्हॅल्यूशन, दुरुस्ती आणि इतर कामांसाठी जर वरील वस्तू लागणार असल्या तर त्याची आयात करता येईल. मात्र, काम संपल्यानंतर त्या वस्तूंची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी लागेल, असे विदेश व्यापार महासंचालनालयाकडून डीजीएफटी सांगण्यात आले आहे.
एचएसएन- 8741 श्रेणीत अल्ट्रा फॉर्म फॅक्टरवाले कॉम्प्युपटर आणि सर्व्हर येतात. आतापर्यंत ही उत्पादने मागवणे सोपे होते, मात्र यावर आता कर भरणे बंधनकराक केले आहे. सॅमसंग, डेल, एसर आणि अॅपल सारख्या कंपन्या चीनसारख्या देशांतून भारत लॅपटॉप, टॅबलेट आणि सर्व्हरची आयात करतो. मात्र, केंद्र सरकारकडून देशातच लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि सर्व्हरच्या निर्मितीला वेग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळेच या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घातला आहे.
या सर्व वस्तूंच्या आयातीवर घालण्यात आलेल्या निर्बंधाचा सर्वाधिक फटका चीनला बसेल, असे मानले जात आहे. दरम्यान, वरील वस्तूंच्या आयातीसाठी आगामी काळात सरकारकडून परवाना घ्यावा लागेल आणि कर देखील भरावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे.