पुढारी ऑनलाईन डेस्क : Electoral Bonds News : भारतीय निवडणूक आयोगाने स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या इलेक्टोरल बाँड्स बाबतची माहिती त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केली आहे. या माहितीमध्ये इलेक्टोरल बाँड्स विकत घेणा-याचे नाव, ज्याचे बॉड्स विकत घेतले त्या पक्षाचे नाव आणि बाँडचा अनुक्रमांक यासारख्या तपशीलांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर निर्णयानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्टोरल बाँड्सचा तपशीलवार डेटा निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला आहे. यानंतर निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरही अपलोड केला. खरं तर, याआधी, SBI द्वारे अपूर्ण डेटा प्रदान केला गेला होता, ज्यामध्ये फक्त खरेदीदार आणि बॉन्डची पूर्तता करणाऱ्याची माहिती उपलब्ध होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कडक निर्देश देत एसबीआयने संपूर्ण माहिती द्यावी, असे आदेश दिले. न्यायालयाने बँकेला ही माहिती सार्वजनिक करण्यास सांगितले जेणेकरुन कोणत्या व्यक्तीने किंवा कंपनीने कोणत्या पक्षाला बाँडद्वारे किती देणगी दिली हे कळू शकेल. आता ही माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरही सार्वजनिक झाली आहे.