Uddhav Thackeray 
Latest

निवडणूक प्रचारगीतातून ‘हिंदू’, ‘जय भवानी’ शब्द वगळा; ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाची निशाणी असलेल्या मशाल चिन्हावरील प्रचारगीतात वापरण्यात आलेल्या 'हिंदू' आणि 'जय भवानी' या धार्मिक शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. गीतातून 'हिंदू' आणि 'जय भवानी' शब्द वगळण्याची नोटीस आयोगाने पाठविली आहे. मात्र, आम्ही हिंदू शब्दावर मते मागितली नाहीत. प्रसंगी आम्ही न्यायालयात जाऊ. पण हे शब्द वगळणार नाही, अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केली.

मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली. 'मशाल गीत' हे प्रचारगीत कार्यकर्त्यांसाठी प्रेरणागीत आहे. या गीतामध्ये 'हिंदू तुझा धर्म, जाणून घे मर्म, जीव त्यास कर तू बहाल' असे कडवे आहे. यातील 'हिंदू' हा शब्द निवडणूक आयोगाला खटकला आहे. मात्र आम्ही धर्माच्या आधारावर कोणतीही मते मागितलेली नाहीत. तसेच या गीतामध्ये 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणाही आहेत. त्यातील 'जय भवानी' हा शब्दही काढण्यास सांगण्यात आले आहे. तुळजापूरची भवानीमाता हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. ही घोषणा लोकांच्या मनामनात आहे. ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे शब्द काढणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.

ठाकरे गटाने आपल्या निवडणूक चिन्हाच्या प्रचारासाठी 60 सेकंदाचे मशाल गीत प्रसारित केले आहे. 'शंखनाद होऊ दे, रणदुंदभी वाजू दे, नादघोष गर्जू दे विशाल' असे हे गीत आहे. त्यामध्ये 'हिंदू तुझा धर्म, जाणून घे मर्म, जीव त्यास कर तू बहाल' हे कडवे आहे. तसेच 'जय भवानी, जय शिवाजी' असा घोषही वापरण्यात आला आहे. मात्र धार्मिक चिन्ह, प्रतिमांचा प्रचारासाठी वापर करण्यास मनाई असल्याने आयोगाने हे दोन शब्द हटविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हे आक्षेप नाकारत गीतातील शब्द हटविणार नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, कर्नाटक तसेच मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बली आणि गृहमंत्री अमित शहांनी मोफत अयोध्या वारी घडविण्याचे म्हटले होते. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आम्ही आयोगाने नियमात बदल केला आहे का, अशी विचारणा केली होती. त्याबाबतचे स्मरणपत्रही पाठविले होते. मात्र त्यावर आयोगाकडून कोणताच खुलासा आलेला नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी-शहांच्या त्या भाषणाचे व्हिडीओ दाखविले. धर्माच्या नावाखाली प्रचार केल्याप्रकरणी बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक आयोगाने सहा वर्षांसाठी मतदान करण्यावर तसेच निवडणूक लढविण्यावर बंदी घातली होती याची आठवणही ठाकरे यांनी करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT