निपाणी : पुढारी वृत्तसेवा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर (शनिवार) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास किंमती मालाची ने आण करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची 12.50 लाख रुपयांची रोखड निवडणूक विभागाने जप्त केली. विशेष म्हणजे आचारसंहिता लागून झाल्यानंतर पाचव्यांदा निपाणी ग्रामीण पोलीस व निवडणूक प्रशासनाने ही कारवाई केली. महिन्यात केवळ याच तपासणी नाक्यावर आतापर्यंत 42 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कोगनोळी टोलनाका येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाका स्थापित करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे येथून बल्लारीकडे खासगी लक्झरी बसमधून ट्रान्सपोर्ट व्यावसायिक के. कार्तिक जात होते. दरम्यान सदरील खासगी लक्झरी बस तपासणी नाक्यावर आली असता, नाक्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बसची तपासणी केली असता के. कार्तिक यांच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये विना कागदपत्राविना 12 लाख 50 हजार रुपये आढळून आले.
त्यानुसार घटनास्थळी सीपीआय बी.एस.तळवार ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी यांनी भेट देऊन मिळालेल्या रकमेबाबतच्या कागदपत्रांची चाचपणी केली. मात्र कार्तिक यांच्याकडून कोणत्याही प्रकारची रकमेबाबत कागदपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे प्रशासनाने मिळालेली रक्कम जप्त करून निवडणूक विभागाकडे सुपूर्द केली.
हेही वाचा :