एकनाथ शिंदे 
Latest

Eknath Shinde : राज्यपालांनी बोलताना काळजी घ्यावी, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

'गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही' असे वक्तव्य मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे…

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ही त्यांची वैयक्तिक प्रतिक्रिया आहे. राज्यपालांनी बोलताना काळजी घ्यावी.  मुंबई च्या विकासातील मराठी माणसाचे योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मुंबईला वैभव मिळवून देण्यासाठी मराठी माणसाचे याेगदान महत्वाचे आहे. ते कोणीही नाकारु शकत नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना खडसावले आहे.

एकनाथ शिंदे मालेगाव दौ-यावर असून ते पत्रकारपरिषदेत बोलत होेते. शिंदे पुढे म्हणाले, राज्यपाल मोठे व संवैधानिक पद आहे. त्यामुळे कुणाचा अवमान होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. मराठी माणसाच्या मेहनतीवर मुंबई आर्थिक राजधानी बनली. मुंबईत अनेक परप्रांतीय काम करतात. पण, मुंबईची अस्मिता मराठी माणसाने जपली. कितीही संकट आले तरी मुंबई थांबत नाही. मराठी माणसाला न्याय मिळावा म्हणून बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यामुळे जी भूमिका बाळासाहेबांची होती तीच आमची आहे असे स्पष्ट करत त्यांनी राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेतला.

मालेगाव जिल्हानिर्मिती बाबत बोलताना शिंदे म्हणाले, मालेगाव जिल्हा निर्मितीची अनेक नेत्यांकडून मागणी होत आहे. ती फार जुनी मागणी आहे. मालेगाव जिल्हानिर्मितीसाठी सरकार सकारात्मक आहे. जिल्हानिर्मिती च्या प्रश्नावर मुंबईत लवकरच बैठक घेऊ व त्यात जिल्हानिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींवर चर्चा करु. आपल्याला लोकांच्या हिताचे काम करायचे आहे, त्यामुळे सर्वच रखडलेले प्रकल्प मार्गी लावू असे शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT