Latest

‘शिंदे’सेनंचं बळ वाढले! समर्थक आमदारांची संख्या ४६ वर, शिवसेनेतून दोन तृतीयांश आमदार फुटले

दीपक दि. भांदिगरे

गुवाहाटी; पुढारी ऑनलाईन : बंडखोरे नेते एकनाथ शिंदे यांना आणखी ६ आमदार जाऊन मिळाले आहेत. यामुळे शिंदे यांचे बळ वाढले असून त्यांच्याकडील आमदारांची संख्या ४६ वर पोहोचली असल्याचे समजते. शिवसेना आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर आणि रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जैस्वाल गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. शिंदे गट आता त्यांच्याकडे दोन तृतीयांश आमदार असल्याचा दावा करत आहे. गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेल परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, गुवाहाटीमध्ये जे आमदार गेले आहेत त्यातील १८ ते २० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जवळपास ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते. आजही शिवसेना आमदारांची गळती कायम असल्याचे शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढत आहे. शिवसेनेचे एक-एक आमदार गायब होत आहेत. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील गुवाहाटीत पोहचले आहेत. पाटील यांनी आधी समर्थकांना 'जय महाराष्ट्र' मॅसेज पाठवला आणि त्यानंतर ते नॉटरिचेबल झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास दोन तृतीयांश आमदार असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समोर बसून चर्चा करण्याचा दिलेला प्रस्ताव धुडकावला असून, महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेने बाहेर पडावे या भूमिकेवर ते ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधल्यानंतर सायंकाळी शिंदे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र तो बेत नंतर रद्द झाला. त्यानंतर रात्री सव्वा आठच्या सुमारास शिंदे यांनी दोन ट्विट करून मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुखांना उत्तर दिले होते. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्‍त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे- शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्रिपद किंवा पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास मी नालायक आहे, असे कोणाला वाटत असेल; तर मला समोर येऊन सांगा. मी दोन्ही पदे सोडायला तयार आहे. मी राजीनामा तयार ठेवतोय, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी बुधवारी ऑनलाईन संवाद साधला आणि रात्री 'वर्षा' बंगला सोडून ते 'मातोश्री' मुक्‍कामी पोहोचले.

पहा व्हिडिओ :

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT