नाशिक : पुढारी ऑनलाइन
नाशिकमध्ये आज पहाटे झालेल्या बसच्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. त्यात 30 हुन अधिकजण जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळाची पाहणी केली व जिल्हा रुग्णालयातील जखमी रुग्णांची विचारपूस करत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला.
अशा दुर्घटना टाळण्यासाठी नाशिकसह राज्यातील अपघात होणारे धोकादायक ठिकाणे (ब्लॅकस्पॉट) शोधून त्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. त्यासाठी संबधित विभागांची लवकरच उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी सर्व संबधित अधिका-यांना सूचना दिल्या. तसेच अपघाताची चौकशी केली जाईल व संबधित दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. शस्रक्रिया झालेल्यांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
यावेळी, पालकमंत्री दादा भुसे, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, माजी सभापती गणेश गिते यांच्यासह पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासना संबधित सर्व अधिकारी उपस्थित होते.