चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव तथा निवृत्त पोलीस अधिकारी एकनाथ कन्नाके यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर-बल्हारपूर मार्गावरील अब्दुल कलाम गार्डन मागील भागात त्यांचा मृतदेह आढळला. कन्नाके यांनी आत्मत्या केली की घातपात? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. हसमुख, प्रेमळ स्वभावाचे राजकारणी हरपल्याने राजकीय वर्तुळात दु:ख व्यक्त केले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, निवृत्त पोलीस अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव एकनाथ कन्नाके हे हसमूख आणि प्रेमळ स्वभावाचे धनी होते. आदिवासी समाजाचे नेते ही त्यांची खरी ओळख होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी राजकारण आणि समाजसेवेवर अधिक भर दिला होता. आज गुरूवारी (२३ जून) ला चंद्रपूर-बल्हारपूर मार्गावरील अब्दुल कलाम गार्डनच्या मागील भागात त्यांचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
आज सकाळी काही नागरिकांना त्याचा मृतदेह दिसून आला. त्यांनी पोलिस विभागाला माहिती दिली. एकनाथ कन्नाकेनी बुधवारी गळफास घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे घातपाताची शक्यता वर्तविली जात असल्याने आत्महत्या की घातपात? याबाबत गूढ कायम आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरीता पाठविले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.