राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (पुणे) झालेल्या राज्य संपादणूक सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जाहीर झाला. यासाठी निवडलेला संशोधन नमुना मोठा आहे. या अहवालातून ग्रामीण विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांपेक्षा अधिक हुशार असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी सरकारी शाळेत शिकणारे विद्यार्थी खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्यापेक्षा अधिक हुशार असल्याचे या अहवालात समोर आले आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांची आघाडी येथे दिले जाणारे अध्ययन अनुभव, वर्गातील अध्यापनाची प्रक्रिया अधिक परिणामकारक असल्याचे दर्शवणारी आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अहवालातून संपादणूक पातळी सुधारत असल्याचे दिसत आहे. मात्र त्याचवेळी तिसरीची गुणवत्ता अधिक चांगली असली तरी आठवीची गुणवत्ता खालावलेली आहे. इयत्तेचा स्तर उंचावत जाताना संपादणूक स्तर मात्र कमी कमी होत जाताना दिसत आहे. तर नेहमीप्रमाणे या सर्वेक्षणातही विद्यार्थिनींची संपादणूक विद्यार्थ्यांपेक्षा अधिक असल्याचे प्रतिबिंबीत झाले आहे. मात्र संवर्गनिहाय असलेल्या संपादणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, संपादणुकीत दिसणारा फरक फार मोठा नाहीये. या अहवालातून ग्रामीण विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांपेक्षा अधिक हुशार असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी सरकारी शाळेत शिकणारे विद्यार्थी खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांपेक्षा अधिक हुशार असल्याचे या अहवालात समोर आले आहे.
राज्याची विद्या प्राधिकरण म्हणून ओळखल्या जाणार्या राज्य शैक्षणिक संशोधनाच्यावतीने इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या मराठी, गणित विषयांच्या अध्ययन निष्पत्तींची संपादणूक पातळी या सर्वेक्षणात मापन केली जाते. यात तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत अध्ययन संपादणूक पातळी तपासणे, विद्यार्थ्यांच्या शिकण्यात कठीण वाटणार्या क्षेत्रांचा शोध घेणे; लिंग, विविध संवर्ग, व्यवस्थानानुसार विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादणुकीत फरक जाणणे, त्याचबरोबर संपादणुकीत आढळून येणार्या फरकाचा विचार करता विविध उपाययोजना सुचवणे, या उद्दिष्टांचा विचार करून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणासाठी निवडलेेला संशोधन नमुना मोठा आहे. सर्वेक्षणासाठी राज्यातील तीनही इयत्तेत शिकणार्या दोन लाख 53 हजार 449 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला गेला आहे. संपादणूक सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील 11 हजार 936 शाळांनी सहभाग नोंदवला होता. सर्वेक्षणामध्ये इयत्ता तिसरीत शिकणारे 66 हजार 695 विद्यार्थी, इयत्ता पाचवीत शिकणारे 83 हजार 968 विद्यार्थी व आठवीमध्ये शिकणारे 1 लाख 2 हजार 786 विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 53.99 टक्के विद्यार्थी शासकीय शाळांमधील आहेत. 46.1 टक्के विद्यार्थी खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. राज्यातील विविध संवर्गातील विद्यार्थी यात सहभागी झाले होते. सर्वेक्षणात 16.2 टक्के विद्यार्थी अनुसूचित जाती, 16.54 टक्के विद्यार्थी अनुसूचित जमातीचे, 22.75 टक्के विद्यार्थी इतर मागास प्रवर्गातील आहेत. 27.39 टक्के विद्यार्थी सर्वसाधारण संवर्गातील, 15.7 टक्के विद्यार्थी भटक्या विमुक्त जाती-जमातीचे आणि 1. 6 टक्के विद्यार्थी विशेष प्रवर्गातील सहभागी झाले होते.
सर्वेक्षणातील संपादणुकीचा विचार करता, तिसरीमध्ये प्रथम भाषा मराठी विषयात राज्याची सरासरी 76.99 टक्के आहे. पाचवीमध्ये 62.21 टक्के, आठवीमध्ये 69.52 टक्के, तर गणितामध्ये तिसरीत 68.50टक्के, पाचवीत 64.47 टक्के व आठवीमधील 49.10 टक्के संपादणूक प्राप्त झाली आहे. तिसरीमध्ये 76 टक्केपेक्षा अधिक अचूक प्रतिसाद देणार्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. तिसरीत मराठी विषयासाठी 61.54 टक्के, गणित विषयासाठी 49.02 टक्के, पाचवीसाठी भाषेत 23.8 टक्के, गणितासाठी 39.6 टक्के, आठवीसाठी मराठी विषयात 49.17 टक्के आणि गणित विषयासाठी अवघी 9.65 प्रतिसादक संख्या आहे. मात्र तीस टक्क्यांपेक्षा अचूक प्रतिसाद देणार्या विद्यार्थ्यांसाठीदेखील दखलपात्र ठरते आहे. त्यामुळे आज संपादन स्तर उंचावला असला तरी अधिकाधिक उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याद़ृष्टीने सूक्ष्म नियोजनाची गरज आहे. राज्याच्या सरासरी संपादणुकीचा अहवाल लक्षात घेता सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांची आघाडी राहिली आहे. केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आलेल्या राष्ट्रीय संपादणुकीच्या अहवालावर नजर टाकली असता, राज्यातील याच जिल्ह्यांची आघाडी आहे. याचा अर्थ या जिल्ह्यामध्ये दिले जाणारे अध्ययन अनुभव, वर्गातील अध्यापनाची प्रक्रिया अधिक परिणामकारक आहे.
राज्यातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग हा उल्लेखनीय असला तरी तेथील विद्यार्थ्यांची संपादणूक अधिक असल्याचे या अहवालाने निर्देशित केले आहे. तिसरीत मराठी विषयाच्या संपादणुकीत 77.42 टक्के संपादणूक ग्रामीण विद्यार्थ्यांची आहे. शहरी विद्यार्थ्यांची संपादणूक 74.99 आहे. हा फरक 2.43 टक्के इतका आहे. गणिताचा विचार करता, ग्रामीण विद्यार्थ्यांची संपादणूक 68.51 टक्के, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांची संपादणूक 67.54 टक्के इतकी आहे. हा फरक 0.97 टक्के आहे. पाचवीच्या स्तरावर मराठी विषयाच्या संपादणुकीत 63.54 टक्के संपादणूक ग्रामीण विद्यार्थ्यांची आहे. शहरी विद्यार्थ्यांची संपादणूक 60.41 आहे. हा फरक 2.13 टक्के इतका आहे. गणिताचा विचार करता, ग्रामीण विद्यार्थ्यांची संपादणूक 64.76 टक्के, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांची संपादणूक 61.72 टक्के इतकी आहे. हा फरक 3.04 टक्के आहे.
आठवीच्या वर्गातील मराठी विषयाच्या संपादणुकीत 70.38 टक्के संपादणूक ग्रामीण विद्यार्थ्यांची आहे. शहरी विद्यार्थ्यांची संपादणूक 68.49 आहे. हा फरक 1.89 टक्के इतका आहे. गणिताचा विचार करता, ग्रामीण विद्यार्थ्यांची संपादणूक 49.77 टक्के, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांची संपादणूक 44. 77 टक्के इतकी आहे. हा फरक 5.58 टक्के आहे. समाजमनात सातत्याने शहरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या संधी उपलब्ध असतात. त्याचबरोबर पालकही आपल्या पाल्यांच्या शिक्षणाबाबत अधिक जागृती दर्शवतात. असे असताना, राज्याच्या तीनही इयत्तांच्या दोन्ही विषयांत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा वरचष्मा आहे.