Latest

मंत्री अनिल परब यांना ईडीचे समन्स

अविनाश सुतार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पुन्हा एकदा चौकशीला हजर रहाण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडीने बजावलेल्या समन्सनुसार परब यांना बुधवारी सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीला हजर रहावे लागणार आहे. त्यामुळे अनिल परब हे चौकशीला हजर रहातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ईडीने मनी लॉन्डिंगप्रकरणी नुकतीच परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थाने, कार्यालये आणि मालमत्तांवर छापेमारी केली होती. यावेळी ईडीकडे परब यांच्याविरोधात काही ठोस पुरावे असल्याने ईडीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी त्याची राहात्या घरात सुमारे 12 तास चौकशी केली होती. त्यानंतर ईडीच्या पथकाने दापोलीमध्ये ठाण मांडून दापोलीमधील त्यावादग्रस्त रिसॉर्टसंबंधी कागदपत्रे प्राप्त केली. याच कागदपत्रांच्या आधारे चौकशी करण्यासाठी अनिल परब यांना ईडीने पाचारण केले आहे. ईडीच्या या कारवाईने राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

दापोली येथे 2017 साली 01 कोटीच्या मोबदल्यात एक जमीन खरेदी करण्यात आली होती. या 01 कोटीच्या जमीन व्यवहाराची नोंद 2019 मध्ये करण्यात आली. पुढे 2017 ते 2020 या काळात येथे तब्बल 06 कोटी रुपये खर्च करून एक मोठे आलीशान रिसॉर्ट बनवले गेले. अनिल परब यांच्या नावाने खरेदी झालेली ही जमीन रिसॉर्ट पुर्ण झाल्यावर अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि केबल व्यावसायिक संजय कदम विकण्यात आली. परंतु, फक्त स्टॅम्प ड्युटी भरली गेल्याचे तपासात समोर आले असून त्यामुळेच अनिल परब हे तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.

ईडीने गेल्यावर्षीच्या जुलै महिन्यात पहिल्यांदा मंत्री अनिल परब यांना चौकशीला हजर रहाण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर ईडीने 30 ऑगस्ट रोजी तीन ठिकाणी छापेमारी केली. यात परबांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) बजरंग खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर छापेमारी करुन काही कागदपत्रे आणि महत्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले होते.

मंत्री अनिल परब यांनी पहिल्या समन्सनंतर चौकशीला हजर न रहाता ईडीकडे वेळ मागितला होता. त्यानंतर ईडीने खरमाटे यांच्यासह वाहन निरिक्षक गजेंद्र पाटील यांचीही चौकशी करुन त्यांचा जबाब नोंदविला. पुढे ईडीने अनिल परब यांना पुन्हा समन्स बजावून 28 सप्टेंबर रोजी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीला हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार अनिल परब हे ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सात तास कसून चौकशी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT