मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महादेव ऑनलाईन गेमिंग-बेटिंग अॅप्सशी संबंधिक मनी लाॅंड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या पाठोपाठ अभिनेत्री हुमा कुरेशी, कॉमेडियन कपिल शर्मा आणि हिना खान यांना समन्स बजावले आहे. ईडीच्या या कारवाईमुळे बाॅलिवूड जगतात एकच खळबळ उडाली आहे.
महादेव ऑनलाईन बेटिंग अॅपचे मुख्य प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी या अॅपच्या माध्यमातून करोडो रुपये कमावले. यातील पैसा हवाला मार्गे विदेशात पाठविण्यात आला. करोडो रुपयांचे रोखीने व्यवहार करण्यात आले. यात अॅपच्या प्रोमोशनसाठी आणि तब्बल २०० कोटी रुपये खर्च करुन दुबईत पार पडलेल्या चंद्राकर याच्या विवाह सोहळ्यासाठी बाॅलिवूड अभिनेते, अभिनेत्री आणि सेलिब्रिटींना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम देण्यात आली. याप्रकरणात १४ ते १५ सेलिब्रिटी आणि बाॅलिवूड अभिनेते, अभिनेत्री ईडीच्या स्कॅनर खाली आहेत. या पैकी अभिनेता रणबीर कपूर याला ईडीने शुक्रवारी रायपूर येथील कार्यालयात चाैकशीला हजर रहाण्यास सांगितले आहे. मात्र त्याने हजर होण्यासाठी काही वेळ मागितल्याची माहिती मिळते.
ईडीने महादेव ऑनलाईन बेटिंग अॅपशी संबंधितांच्या मुंबईसह कोलकता, भोपाळ अशा तब्बल ३९ ठिकाणी छापेमारी करुन तब्बल ४१७ कोटींची अवैध मालमत्ता जप्त करत सुमारे १५ जणांना अटक केली आहे. तर, चंद्राकर याच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेले अभिनेता टायगर श्रॉफ, कृष्णा अभिषेक, अभिनेत्री सन्नी लियॉनी, भाग्यश्री, क्रिती खरबंदा, नुसरत भरूचा, पार्श्वगायिका नेहा कक्कड, पार्श्वगायक आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी, कॉमेडियन भारती सिंग आदीं ईडीच्या रडावर आहेत.