Nana Patole 
Latest

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, सरकार मात्र होळी, धुलवड खेळण्यात मग्न; नाना पटोले

मोनिका क्षीरसागर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. कांदा, कापूस, धान, सोयाबीन, हरभरा, तुरीसह शेतमालाला भाव नाही, त्यातच अवकाळीने झोडपल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची राखरांगोळी झाली आहे, त्यामुळे सर्व कामकाज बंद करून शेतकऱ्यांबद्दल सरकराची भूमिका काय आहे हे कळले पाहिजे. संकटातील शेतकऱ्यांला सरकारने तातडीने मदत जाहीर केली पाहिजे. पण इकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असताना, ईडी सरकार मात्र होळी, धुलवड खेळण्यात मग्न असलेले दिसते, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजचे कामकाज सुरु होताच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी यासाठी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव दाखल केला होता, पण सरकारने तो फेटाळला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले व त्यांनी सभात्याग केला. याविषयावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, अवकाळी पावासाने शेतातील उभी पिकं खराब झाली. गहू, हरभरा, फळबागा, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती असताना यापेक्षा दुसरा कोणता महत्वाचा विषय आहे. सर्व प्रश्न बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे अशी विरोधकांची मागणी होती पण सरकारने त्यावर समाधानकारक उत्तर दिले नाही.

विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, माहिती घेऊन नंतर भूमिका मांडू अशी सरकारची मोघम भूमिका होती. दोन दिवसाच्या अवकाळी पावसाने शेतातील पीकं जमीनदोस्त होत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत. पण इथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मात्र धुळवड खेळण्यात मग्न होते, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण होऊ नये, हीच विरोधकांची मागणी आहे. पण मागील आठवड्यातही कांदा, सोयाबीन, कापसचा प्रश्न उपस्थित केला होता. नाफेड कांदा खरेदी करत असल्याचे सरकारने सभागृहात सांगितले, पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. कांदा खरेदी होत नाही. वीज कनेक्शन कापणार नाही, असे सांगितले होते पण विदर्भ विभागातच ९९९५ शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले आहे. सरकार सभागृहात एक सांगते पण वस्तुस्थिती वेगळी आहे. म्हणून विरोधकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता, पण सरकारने स्थगन प्रस्ताव नाकारला. शेतकऱ्यांचा रंग बेरंग झाला असताना सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात असल्याचे पटोले म्हणाले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT