Latest

दोन सेना, दोन मेळावे

Arun Patil

दोन शिवसेनांचे दोन दसरा मेळावे आज मुंबईत होतील. राज्यभरातून गर्दी जमवली जाईल. त्यासाठी शेकडोंच्या संख्येने गाड्या बूक झाल्या. शिवसेनेविरुद्ध उठाव करत चाळीस आमदारांनी सुरत, गुवाहाटी, गोवा असे सीमोल्लंघन करीत शिंदे गट गाठला आणि या बंडातून मूळ शिवसेनेला, ठाकरेंच्या शिवसेनेला, शिवसेनेला जन्म देणार्‍या मातोश्रीला आव्हान देणारी प्रति-शिवसेना उभी राहिली.

ठाकरे वगैरे सब झूट, आमचीच खरी शिवसेना, असा शिंदे गटाचा दावा आहे. त्यानुसार शिवसेनेचा शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा दसरा मेळावा ताब्यात घेण्यास शिंदे गट सरसावला; पण खुद्द न्यायालयाने त्यास रोखले; अन्यथा आज शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे विचारांचे सोने लुटताना दिसले असते आणि दसरा मेळाव्याची परंपरा निर्माण करणार्‍या ठाकरेंना दुसरीकडे कुठे तरी जागा शोधत आपला मेळावा घ्यावा लागला असता; पण तसे झाले नाही. न्यायदेवता ठाकरेंच्या बाजूने उभी राहिली म्हणून आज मूळ शिवसेना शिवाजी पार्कवर आपली दसरा मेळाव्याची परंपरा जपत ठाकरी विचारांचे सोने लुटताना दिसेल. शिवसेना विरुद्ध शिंदे गट हा गेले चार महिने चाललेला संघर्ष आता शिलंगणाला पोहोचतो  आहे.

या संघर्षाच्या काळात सतत चकमकी झडल्या. शमीच्या झाडावर शस्त्रास्त्रे ठेवून कुणीच कुठे गेले नाही. प्रत्येकाची हत्यारे परजत राहिली. वार-पलटवार होत आले. त्यामुळे या शिलंगणालाही कमरेला तलवारी लावूनच दोन्ही सेना उतरतील. दोन सेनांच्या शिलंगणातून महाराष्ट्राच्या पदरी कोणत्या विचारांचे सोने पडणार, हा मात्र प्रश्न आहे. शिवसेनेविरुद्ध उठाव करण्यामागे भाजपचा सत्तांतराचा विचार होता आणि तो महाराष्ट्राला कळून चुकला आहे.

या उठावाला शिवसेनादेखील पुरून उरली, बंडातून सावरली, उभी राहिली आणि राजकीय अभिसरणाची नवी समीकरणे मांडत झेपावू पाहत आहे. त्यामुळेच शिंदे गटाचा प्रति दसरा मेळावा हा भाजपच्याही प्रतिष्ठेचा मुद्दा झालेला दिसतो. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे विशेष पाहुणे असतील, असे म्हटले जात होते. मग तो दसरा मेळावा प्रति शिवसेनेचा राहिला नसता. शिंदे-भाजप-मनसे युतीचा तो दसरा मेळावा झाला असता आणि उद्धव यांचा ठाकरी दसरा मेळावा आपसूक उजवा ठरला असता. म्हणून या मेळाव्याचा केंद्रबिंदू एकनाथ शिंदे यांच्याशिवाय अन्य कुणी असू नये, याची काळजी भाजपने घेतली.

राज यांचे राजकारणच वेगळे. दुसर्‍यांच्या प्रचारातही ते सभा जरूर घेतात; पण सभा फक्त त्यांची असते. दुसर्‍याच्या सभेत जाऊन अनेकांपैकी एक वक्ते होणे त्यांना पसंत नाही. फडणवीस, राज आता दुरून हा मेळावा बघतील आणि शिंदेशाहीच्या विचारांचे सोने लुटतील. बहुतांश शिवसेना लुटून झाली. आता उरली सुरली शिल्लक सेना गारद करण्यासाठी सतत रचल्या जाणार्‍या चक्रव्यूहाचा भाग म्हणजे शिंदे गटाचा दसरा मेळावा. भाजपने आपली संपूर्ण ताकद जशी चट्टान की तरह शिंदे यांच्या बंडाळीमागे उभी केली, तशीच ती शिंदेशाहीच्या दसरा मेळाव्याच्या पाठीशीदेखील उभी केली.

या मेळाव्यात जनसागराच्या लाटा उसळल्या तर ठाकरे संपले, ठाकरेंची शिवसेना संपली, अशी घोषणा बीकेसीच्या मेळाव्यातच करता येईल. किंवा तसा झटपट जीआरदेखील दसर्‍याच्या मुहूर्तावर जारी करता येईल, असेही आडाखे भाजपने मांडले असू शकतात. त्यातूनच दसरा मेळाव्याला गर्दी जमावण्याइतकीही ताकद शिवसेनेत राहिलेली नाही, असा प्रचार भाजपने सुरू केला.

काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेला शिवसेनेने गर्दी पुरवायची आणि शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्याला काँग्रेसने माणसे पाठवायची, असा करारच म्हणे शिवसेना-काँग्रेसमध्ये झाला. ते खरे मानायचे झाले तर मुंबईत गर्दी जमविण्याची, गर्दी पुरविण्याची ताकद शिवसेनाच नव्हे तर काँग्रेसदेखील बाळगून आहे, हे मान्य करावे लागेल. आपणच शिल्लक सेनेची आणि बुडत्या काँग्रेसची ताकद मान्य करत आहोत, हे गर्दीचे राजकारण.
– विवेक गिरधारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT