शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: मांजरेवाडी (ता. शिरूर) येथील चासकमान धरणाचा उजवा कालवा पाण्याच्या दबावामुळे शुक्रवारी १५ जुलै ला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फुटला. कालवा फुटल्याने पाणी शेजारच्या शेतामध्ये घुसले असून नुकसानीचा नेमका अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला नाही. महसूल विभागाकडून सोमवारी पंचनामा करण्यात येणार असून त्यानंतरच नुकसानीचा अंदाज येणार आहे.
शिरूर तालुक्यातील मांजरेवाडी-वाजेवाडी या गावांमधून चासकमानचा उजवा कालवा जातो. मागील पाच दिवसांपासून संततदार पावसामुळे घटनास्थळावरील माती भुसभुशीत झाली होती, तसेच मागील दोन दिवसापासून चासकमान धरणातून कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले होते. पाण्याचा दबाव वाढल्यामुळे हा कालवा फुटला. वाजे यांनी कालवा फूटल्याबाबतची माहिती अधिकाऱ्यांना दिली.
याबाबत उपअभियंता एस. बी. दिग्गीकर यांनी सांगितले की, कालवा फुटल्यानंतर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून जलद गतीने कालव्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. यासाठीची मशिनरी व मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले असून काम सुरू करण्यात आले आहे.