Latest

वेशांतरांमुळे धुळीला मिळाला ड्रग्ज निर्मिती तस्करीचा बाजार !

Arun Patil

कोल्हापूर : लंगरपेठ, ढालेवाडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि कवठेमहांकाळ पोलिसांना तसूभरही थांगपत्ता न लागलेल्या इरळी हद्दीतील कोट्यवधी उलाढालीच्या ड्रग्ज निर्मिती अड्ड्याचा मुंबई पोलिसांना दीड महिन्यापूर्वी सुगावा लागला होता. मात्र, गोपनीयता पाळण्यात आली होती. ऑपरेशनही सोपे नव्हते. संभाव्य धोका गृहित धरून पोलिसांनी वेशांतर केले. कोणी शेतमजूर… कोणी भिक्षुक, वासुदेव तर काही ज्योतिषी अन् पिंगळे… सावज टप्प्यात येताच 22 व्या दिवशी मध्यरात्रीला 'करेक्ट' कार्यक्रम झाला अन् ड्रग्ज तस्करीचा बाजार धुळीला मिळाला.

कवठेमहांकाळसारख्या दुष्काळी टापूत आरोग्याला घातक ठरणार्‍या ड्रग्ज निर्मितीचा अड्डा चालविला जातो आणि छापेमारीत 245 कोटींचा 122 किलो एमडी ड्रग्जसाठा मुंबई क्राईम ब—ँचच्या हाताला लागतो ही बाब निश्चितच मनाला न पटणारी पण वास्तव्य आहे. सामाजिक, राजकीयद़ृष्ट्या अत्यंत सवेदनक्षम आणि जागरूक अशा जिल्ह्यात ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीचा प्रकार जिल्ह्याच्या वैभवाला काळिमा फासणारा आहे. त्यामुळे या कृत्याचा पोलखोल होण्याची आवश्यकता आहे.

स्थानिक यंत्रणांची बेपर्वाई…!

कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याने आजवर अनेक टोळीयुद्धे अनुभवली आहेत. एन्काऊंटरचा थरार डोळ्यांनी पाहिला आहे. अमली तस्करी नित्याची बाब असली तरी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज निर्मिती अड्ड्याचा प्रकार गंभीर आणि समाजाला घातक ठरणारा आहे. त्यात सांगली जिल्ह्यात कुपवाडपाठोपाठ कवठेमहांकाळ तालुक्यात अवघ्या महिन्यात 245 कोटींचा ड्रग्जसाठा मुंबई पोलिसांच्या हाताला लागणे म्हणजे स्थानिक पोलिस यंत्रणेची बेपर्वाई अन् निष्काळजीवृत्ती म्हणावी लागेल.

संभाव्य धोका गृहित धरूनच ऑपरेशन फत्ते !

मुंबई क्राईम ब—ँच पथकाला सांगली जिल्ह्यातील इरळी हद्दीतील ड्रग्ज निर्मिती व तस्करीचा सुगावा फेब्रुवारी 2024 मध्ये लागला होता. संशयित महिला परवीना शेख, साजिद शेख, इजाज अन्सारीसह आदिल बोहरा याच्या चौकशीतून इरळी हद्दीतील ड्रग्ज निर्मिती करणार्‍या अड्ड्याची माहिती पुढे येताच पथकाने अत्यंत सावधगिरी पाळली होती. अड्ड्यांवरील छापेमारी धोकादायक अन् अडचणीची होती. कदाचित त्याचे बूमरँगही अधिकारी, कर्मचार्‍यांच्या जीवावर येऊ शकले असते. संभाव्य धोका गृहित धरूनच ऑपरेशनची तयारी सुरू होती.

खात्री झाली… बेत ठरला अन् करेक्ट कार्यक्रम झाला !

वेशांतर केलेल्या पथकाने प्रसंगी रस्त्यावर, उपाशीपोटी राहून 20-22 दिवस काढले. याकाळात मोटारीतून अड्ड्यावर कच्च्या मालांची आवक होत होती. तयार ड्रग्ज बॉक्समधून पाठविण्यात येत होते. अड्ड्यातील दोन संशयित तासातासाने बाहेर येऊन डोकावत होते. 20 दिवसांनंतर पथकाची खात्री झाली. मध्यरात्रीला सारेजण एकत्रित आले अन् करेक्ट कार्यक्रमचा बेत ठरला!

वेशांतर : अंगावर फाटके कपडे… शेतमजूर, भिक्षुक, कोणी वासुदेव !

इरळी हद्दीतील ड्रग्ज अड्ड्यांसह परिसरात साधारणत: तीन किलोमीटरचा सारा परिसर निर्जन व माळरान असल्याने वेशांतर करून संशयितांच्या हालचालींवर पाळत ठेवणे अडचणीचे होते. तरीही पथकातील तीन अधिकार्‍यांसह आठ जवानांनी ठिकठिकाणी वेशांतर करून कामाची जबाबदारी स्वत:वर घेतली होती. कोणी भिक्षुक… कोणी पाणाड्या… दोघे शेतमजूर… अंगावर मळके, फाटके कपडे परिधान करून हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येत होती. संशयित वासुदेव जाधव याच्या शेतात मजुरीसाठी अधिकार्‍याने प्रयत्न केला होता. जाधवने द्राक्षबागेत येण्यास कडक शब्दात मज्जाव केला होता.

संशयितांच्या मालमत्तेवर टाच : तत्काळ प्रक्रिया सुरू

ड्रग्ज तस्करीतून कमावलेल्या पैशातून संशयितांनी वर्षभरात अनेक व्यवहार केले आहेत. शेतजमीन, प्लॉट, फ्लॅट, बंगला, आलिशान वाहनेही खरेदी केली आहेत. संबंधित मालमत्तांचा शोध घेऊन त्यावर टाच आणण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. महसूल यंत्रणेशीही संपर्क साधण्यात आला आहे. बँक खातीही गोठविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर असल्याचे समजते.

नृत्यांगना गौतमीच्या अदाकारीवर वासुदेव फिदा !

मुंबई पोलिसांच्या कारवाईपूर्वी संशयित वासुदेव जाधव रिलॅक्स होता… नो टेन्शन…गावातल्या यात्रेची झाडाखाली बैठक रंगली करमणुकीच्या कार्यक्रमावर चर्चा होताच वासुदेव जाधव म्हणाला, 'यात्रेत यंदा गौतमीचा झक्कास कार्यक्रम करायचा. होणार्‍या खर्चाची काळजी नको. आपण बघू. दहा, पंधरा लाख उडवायचेच.' वासुदेवला अटक झाल्यानंतर गावागावात त्याच्या गौतमीच्या नियोजित कार्यक्रमावरच चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT