File Photo  
Latest

राज्यातील ड्रग्ज निर्मितीचे कारखाने पोलिसांच्या रडारवर; लवकरच ANTF ची स्थापना

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ससून रुग्णालयातून पसार झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटील याला बेंगलोरमधून जेरबंद करत त्याचा नाशिकमधील अमली पदार्थांचा कारखाना उद्धस्त केल्यानंतर आता राज्यातील बंद पडलेले, भाडेतत्वावर दिलेले आणि ड्रग्ज निर्मिती करणारे कारखाने पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पोलिसांकडून स्थानिक पातळीवर अशा सर्व कारखान्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

स्थानिक पोलिसांव्यतिरीक्त अन्य कोणत्याही यंत्रणेने अशा प्रकारे अवैध ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, राज्यात लवकरच अॅन्टी नार्कोटीक्स टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असून विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी या पथकाचा प्रमुख असणार असल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि राज्य पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी दिली.

तीन अधिकाऱ्यांवर कारवाई

अमली पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांसह जिल्हा पातळीवर सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. अन्य यंत्रणेला एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे कारखाने आढळल्यास स्थानिक प्रभारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना आहेत. राज्यात सध्या नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर येथील कारखान्यांवर कारवाई झाल्यामुळे येथील तीन अधिकाच्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांची नियंत्रण कक्षांमध्ये बदली करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी सांगितले.

  • राज्य पोलिसांनी यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये केलेल्या कारवाईमध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली.
  • पोलिसांनी दोन हजार ४९१ गुन्हे दाखल करुन तीन हजार २७७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, तर अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी नऊ हजार ५३० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
  • गेल्यावर्षी याच कालावधीत एक हजार ५३० गुन्ह्यांची नोंद झाली होती. या कारवाईत दोन हजार १३ जणांना अटक करण्यात आली होती. अमली पदार्थ सेवन करणाऱ्या १० हजार ५३६ जणांवर गुन्हे दाखल केले होते.
  • विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला पाच हजार २२४ किलो गांजा, १११ किलो ओपियम आणि १७३ किलो मेफेड्रोन नष्ट करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्यातील यंत्रणांमध्ये चांगला समन्वय असल्याने अमली पदार्थविरोधी कारवाया वाढल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT