Latest

Kolhapur | डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे प्रबोधनाचे कार्य समाजाला चांगल्या दिशेला नेणारे : डॉ. अनिल काकोडकर

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. ते कोणाच्या हातात जाते, त्यावर ते चांगले की वाईट ठरणारे आहे. सर्वांचे सक्षमीकरण होईल, कोणाचेही शोषण होणार नाही, असा तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा. त्यासाठी तसा वापर करणारी पिढी निर्माण झाली पाहिजे. यासाठी महत्त्वाचे असलेले शिक्षण आणि प्रबोधनाचे कार्य डॉ. कणबरकर आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले आहे. डॉ. कणबरकर यांच्या नावाचा पुरस्कार आणि पुरस्कार स्वीकारणारे डॉ. जाधव हा अपूर्व मिलाप आहे. तो समाजाला चांगल्या दिशेला नेणारा आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, राजीव गांधी विज्ञान आयोगाचे अध्यक्ष, डॉ. अनिल काकोडकर यांनी गुरुवारी काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार डॉ. काकोडकर यांच्या हस्ते दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शानदार समारंभात प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. याप्रसंगी दै. 'पुढारी'चे चेअरमन, समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांची प्रमुख उपस्थित होती. अत्यंत कृतज्ञापूर्वक हा पुरस्कार स्वीकारत असून हा पुरस्कार दै. 'पुढारी'चे वाचक आणि कोल्हापूरच्या जनतेला अर्पण करत असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

डॉ. काकोडकर म्हणाले, जग झपाट्याने पुढे चालले असून समाजाची भूमिका काय असावी हे सांगणे मोठे आव्हान बनले आहे. प्रगल्भ समाजाचे शैक्षणिक संस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान राबविण्याबाबतचा विचार, प्रोत्साहन हे चार स्तंभ आहेत. शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रास स्वायत्तता हवी असते. मात्र या कोणीही लुडबुड करू नये. स्वायत्ततेला टाच लागल्यास संस्थेचा दर्जा खालावण्यास सुरुवात होते.

सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, कोल्हापूरकरांनी साथ दिल्याने पंचगंगा किनारी तांबड्या लाल मातीत जोतिबा व अंबाबाई यांच्या वरदहस्ताने चांगल्या गोष्टी करू शकलो. डॉ. कणबरकर यांनी शैक्षणिक कार्यास जीवन वाहून घेतले. प्राचार्य, प्रशासक व कुलगुरू म्हणून त्यांची कारकीर्द मोठी होती. शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतात. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीबद्दल आपल्याला नितांत आदर आहे. शिक्षक, प्राध्यापक क्लासमध्ये शिकवतात. मात्र संपादक 'मास'ला शिकवतात. हा दोघांमधील मूलभूत फरक आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांना कंट्रोल करणे शक्य आहे. परंतु 'मास'ला कंट्रोल करणे अवघड आहे.

भारताला मोठी प्राचीन संस्कृती आहे. शैक्षणिक परंपरा आहे. इंग्लंड, अमेरिकेत 1096 ला ऑक्सफर्ड तर 1209 ला केंब्रिज विद्यापीठ स्थापन झाले. पण पाचव्या शतकात भारतात नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला अशी विद्यापीठे ज्ञानदान करीत होती. नालंदा हे जगातील पहिले विद्यापीठ आहे. यात अर्थशास्त्राचे गुरू आर्य चाणक्य, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, आयुर्वेदाचे जनक चरक यांच्यासह अनेक विद्वानांनी शिक्षण घेतले. गौतम बुद्धही या विद्यापीठात येऊन गेले. 12 व्या शतकात मुघल आक्रमणात ही विद्यापीठे पाडली. त्यातील 90 लाख हस्तलिखिते जाळली. हे भारताचे दुर्दैव आहे. जर भारतावर मुघल व इंग्रजांचे आक्रमण झाले नसते तर भारताने शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात जगाचे नेतृत्व केले असते.

स्वातंत्र्यानंतर देशात साक्षरतेचे प्रमाण 7.12 टक्के होते, ते आज 74 टक्के झाले आहे. परंतु 144 कोटी लोकसंख्येच्या देशातच अजनूही 43 कोटी लोक अशिक्षित आहेत. 1968च्या कोठारी कमिशनच्या अहवालानुसार शिक्षणावर जीडीपीच्या 6 टक्के खर्च करणे अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने आज शिक्षणावर म्हणावा तेवढा खर्च होत नाही. शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे शिक्षण सक्तीचे, बंधनकारक केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिकले पाहिजे.

शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. पत्रकारितेत पूर्वी खिळे जुळवावे लागत होते. आज त्याची जागा संगणकाने घेतली आहे. आज प्रत्येक गोष्ट मोबाईलवर उपलब्ध आहे. भारतात तंत्रज्ञानाच्या वापराबाबत साशंकता व्यक्त करणारे आज डिजिटल इंडियाच्या प्रगतीने थक्क झाले आहेत. याचे श्रेय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार भारत जगातील 11 वी मोठी अर्थशक्ती होती. ती आज पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. 2030 मध्ये भारत जगातील तिसरी आर्थिक शक्ती बनणार आहे. 62 टक्के तरुण लोकसंख्येसह देश सर्वात तरुण राष्ट्र ठरणार आहे. यामुळे तो भारतासाठी डेमोग्राफिक डिव्हिडंड ठरणार आहे.

जग आज वैश्विक खेडे बनले, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले, लोकशाही, प्रशासन, न्याय व्यवस्था या स्तभांमध्ये सुसंवाद राहिलेला नाही. त्यामुळे चौथा स्तंभ असणारी वृत्तपत्रे व पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे. भारतीय राज्यघटनेने आचार-विचार स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क दिला आहे. सर्वसामान्यांपेक्षा पत्रकारांना वेगळे स्वातंत्र्य नाही. कुठलेही स्वातंत्र्य अनिर्बंध असूच शकत नाही. लिहिणार्‍यांनी दुसर्‍यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.

भ-ष्टाचार आज शिष्टाचार झाला आहे. पूर्वी सत्ता, पैसा सगळ्या गोष्टी असणारे प्रस्थापित राजकारणात येत होते. आज विस्थापितच राजकारण करीत आहेत. साहित्यिक व पत्रकार यांच्यात समाजाचे प्रतिबिंब पडलेले असते. साहित्यिकापेक्षा लेखणीच्या माध्यमातून दोन पाऊल पुढे पत्रकार चालत असतो, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

डॉ. जाधव यांनी विद्यापीठाशी आजही नाते जपले : डॉ. शिर्के

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, राज्यात आणि देशात सामाजिक आणि राजकीय पर्यावरणावर मोठा प्रभाव टाकणारे डॉ. प्रतापसिंह जाधव आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान असणारे प्राचार्य रा. कृ. कणबरकर अशा दोन ध्येयनिष्ठ नेतृत्वाचे विद्यापीठास योगदान लाभले. या समारंभाच्या निमित्ताने एका ध्येनिष्ठ नेतृत्वाचा गौरव आणि एकाचे स्मरण करण्याचा योग लाभला.

स्वर्गीय लता मंगेशकर यांनी डिलिट प्रदान समारंभात विद्यापीठात संगीत विभाग नसल्याची खंत व्यक्त केली होती. या प्रसंगाची आठवण सांगितली. डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठात संगीत विभागाच्या निर्मितीसाठी रा. कृ. कणबरकर यांनी बैठक घेतली. बैठकीत डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या समितीने तब्बल 40 लाखांहून अधिक निधी विद्यापीठास दिला. यातून संगीत विभाग सुरू झाला. संगीत विभाग ते सध्याचे डॉ. ग. गो. जाधव अध्यासन, असे डॉ. जाधव यांचे चाळीस वर्षांचे ऋणानुबंध आहेत. विद्यापीठाशी असलेले नाते आजही कायम जपले आहे.

डॉ. ग. गो. जाधव अध्यासनात डिजिटल पत्रकारितेसह बी.ए. इन फिल्म मेकिंग, कम्युनिटी रेडिओ असे आधुनिक अभ्यासक्रम आणि उपक्रम सुरू होत आहेत, याचे संपूर्ण श्रेय डॉ. जाधव यांनाच जाते. यामुळेच एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानंतर ते पूर्ण झाल्याशिवाय डॉ. जाधव थांबत नाहीत. याचा प्रत्यय या निमित्ताने विद्यापीठास पुन्हा एकदा आला आहे.

पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. भालबा विभूते यांनी मानपत्राचे वाचन केले. प्राचार्य डॉ. खोत यांनी रा. कृ. कणबरकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी. ए. खोत यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन नंदीनी पाटील आणि धैर्यशील यादव यांनी तर कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

पुरस्कार सोहळ्यानंतर सभागृहात उपस्थित विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यासपीठावर येऊन डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. अभिनंदन करण्यासाठी व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी होती. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

रा. कृ. कणबरकर शिष्यवृत्ती सुरू करणार

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पुरस्काराच्या रकमेसह तेवढीच रक्कम विद्यापीठास जाहीर केली. या रकमेतून रा. कृ. कणबरकर यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू करण्याची सूूचना विद्यापीठास केली. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी ही सूचना मान्य करून लवकरच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून शिष्यवृत्ती लवकरात लवकर सुरू करण्याची ग्वाही यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT