अश्गाबत : जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. अशी ठिकाणे पाहण्यासाठी लोक जगाच्या कानाकोपर्यातून येत राहतात. यातील काही जागा कृत्रिम, बनावट वाटतात, तर काही अगदी उत्कट. तुर्कमेनिस्तानमध्येही अशीच एक आगळीवेगळी जागा आहे. याला गॅस क्रेटर या नावाने ओळखले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक जण याला नरकाचा दरवाजा, असेही म्हणतात. या जागेचे वेगळेपणे असे की, येथे एक प्रचंड मोठा खड्डा आहे, ज्यात गेल्या कित्येक वर्षांपासून आग लागलेली आहे आणि ती अजून विझलेली नाहीय!
या भल्या मोठ्या खड्ड्यात आग कशी लागली, याचे कारण कोणालाच माहीत नाही. मात्र, असे म्हटले जाते की, 1971 मध्ये काही मजूर येथे खोदाई करत असताना अचानक तेथे मिथेन गॅस बाहेर पडला. लोकांच्या सुरक्षिततेसाठी या गॅसला आग लावण्यात आली, जेणेकरून लोकांना धोक्याची सूचना मिळेल आणि गॅस संपल्यानंतर आग आपोआप विझेल; पण प्रत्यक्षात ही आग कधीच थांबली नाही. आजतागायत येथील अग्नी धगधगताच राहिला आहे.
या जागेत सातत्याने आगीचे धूमशान सुरू असल्याने याला नरकाचा दरवाजा, असे नाव पडले. या आगीमुळे आसपास राहणार्या लोकांना बर्याच आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते; पण यानंतरही पर्यटकांमध्ये ही जागा बरीच प्रसिद्ध आहे. प्रकृतीला होणारा त्रास पाहता या जागेजवळ जाऊ नये, असे सांगितले जाते; पण तरीही लोक येथील आगीचे फोटो काढण्यासाठी शक्य तितके जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. प्रारंभी फक्त तोंडी सूचना दिली जात होती; पण त्याचे पालन होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर येथील प्रशासनाने आता तेथे कुंपण घालून हा परिसर काही अंतरापुरता बंदिस्त केला आहे.