World Arthritis Day 2022 
Latest

जागतिक संधिवात दिवस : संधिवाताच्या सुरुवातीच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको; वेळीच घ्या काळजी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: संधिवात ही वेदनादायी अवस्था असते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील एक नाही तर अनेक सांध्यावर परिणाम होतो. सातत्याने सुरू असणारी सांधेदुखी आणि जडपणामुळे रूग्णांना त्याच्या दैनंदिन कामात अडथळा येतो. याकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीच्या हालचालींवर देखील विपरित परिणाम होतो. हाडाशी संबंधित हा आजार वयोमानानुसार अधिक गंभीर होत जातो.

संधिवात या गंभीर आरोग्य स्थितीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १२ ऑक्टोबर रोजी जागतिक संधिवात दिवस पाळला जातो. यंदाच्या जागतिक संधिवात दिनाची थीम ही 'हे तुमच्या हातात आहे, कृती करा' ('It's in your hand, take action.) अशी आहे. या थीमचा उद्देश संधिवात असलेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि लोकांना संधिवात रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकेल अशा आवश्यक कृती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. सांधेदुखीची सुरुवातीची चिन्हे आणि लक्षणे समजून घेतल्यास या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात मदत होऊ शकते तसेच, लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेण्यास मदत करेल. चला तर जाणून घेऊया काय आहेत संधिवातची सुरुवातीची लक्षणे…

सांधे दुखणे

शरीराची हालचाल केल्यानंतर साधे दुखत असतील तर याकडे दुर्लक्ष करू नका. सांध्यामध्ये वेदना होणे किंवा सातत्याने साधे दुखणे हे संधिवाताचे प्राथमिक लक्षण आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून उपचार घ्या.

सांध्यावर सूज आणि लवचिकता

संधिवातामुळे सांधे दुखतात आणि ते सुजतातही. सांध्यातील वंगण असलेले सायनोव्हियल हा द्रवपदार्थ संधिवात रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात असते. यामुळे सांध्यामध्ये जळजळ जाणवते आणि रुग्णाच्या हालचालींवरही मर्यादा येतात. सातत्याने सांधे दुखणे, सूज येणे यामुळे हाडांमध्येही लवचिकता निर्माण होतेय यामुळे हाडे आणि सांधे नाजूक बनतात, त्यामुळे त्यांना सहज इजा पोहचते.

सांध्याजवळ लालसरपणा

सातत्याने साधे दुखत असतील असल्यास काही रुग्णांना सांध्याभोवती लालसरपणा देखील दिसू शकतो. हे संधिवाताचे प्राथमिक लक्षण असू शकते, त्यामुळे याकडे वेळीच लक्ष द्या.

सांध्यात जड किंवा कडकपणा

बर्‍याच रुग्णांना सकाळी उठल्या उठल्या सांध्यात जडपणा जाणवतो. तसेच पाऊसाचे वातावरण झाल्यास किंवा हवामानात बदल झाल्यास सांध्यातील जडपणा आणि वेदना वाढते. वेळेत काळजी न घेतल्यास हा आजार वाढून, संधिवातीसारखी समस्या निर्माण होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT