पुढारी ऑनलाईन डेस्क : पुन्हा एकदा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो तर मागील सत्ता काळाप्रमाणेच काही मुस्लिम देशांवर पुन्हा प्रवास बंदी घातली जाईल, असे आश्वासन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी दिले. शनिवारी ( दि.२८) रिपब्लिकन-ज्यू परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ट्रम्प म्हणाले, 'तुम्हाला प्रवास बंदी आठवते का? राष्ट्रपती पुन्हा निवडून आल्यास, पहिल्या दिवसापासून पुन्हा प्रवास बंदी लागू केली जाईल. ट्रम्प म्हणाले की, ज्यांना आमचा देश नष्ट करायचा आहे असे लोक आमच्या देशात येऊ द्यायचे नाहीत. माझ्या राष्ट्राध्यक्ष कार्यकाळात सरकारने लागू केलेल्या प्रवास बंदीला चांगले यश मिळाले आहे त्या चार वर्षात एकही घटना घडली नाही कारण आम्ही वाईट लोकांना आमच्या देशापासून दूर ठेवले.
डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. 2017 मध्ये ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात इराण, लिबिया, सोमालिया, सीरिया, येमेन, इराक आणि सुदानमधील लोकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली होती. मात्र, नंतर इराक आणि सुदानसाठी हे निर्बंध हटवण्यात आले होते.
यावेळी ट्रम्प यांनी हमास विरुद्धच्या लढाईत इस्रायलचे उघड समर्थन केले. तसच हमासचा पूर्ण नायनाट करण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रत्येक इस्रायली आणि अमेरिकन नागरिकाच्या वतीने आम्ही हमासच्या रानटी हल्ल्याच्या विरोधात 110 टक्के इस्रायलसोबत आहोत. ज्यो बायडेन हे एक कमकुवत अध्यक्ष आहेत. त्यांच्या कमकुवतपणामुळेच त्यांचा देश या स्थितीला पोहोचला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
आज जगात तणावाचे वातावरण आहे. मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर इस्रायलवर कधीही हल्ला झाला नसता. मी पुन्हा एकदा इराणवर निर्बंध लादून त्यांचा निधी बंद करेन. पुन्हा सत्तेवर आल्यास अमेरिकेच्या शत्रूंना अमेरिकन लोकांचे रक्त सांडण्यापूर्वी विचार करावा लागेल कारण आम्ही त्यांच्या रक्ताच्या एका थेंबासाठी गॅलन रक्त सांडू, असा इशाराही त्यांनी दिला.