वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : 2024 मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत असून माजी राष्ट्राध्यक्ष दोषारोपप्रकरणी गजाआड जाणार की पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार, याबाबतची चर्चा अमेरिकेत सुरू आहे.
2020 सालच्या निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईटहाऊस समोर राडा केला होता. ट्रम्प यांनी सत्ता हस्तांतरण करण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे त्यांच्यावर आणखी एक दोषारोप दाखल करण्यात आले असून त्यांना लवकरच न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे. आगामी निवडणुकीत ट्रम्प यांना सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ते सत्तेत आल्यास त्यांच्यावरील आरोपातून सुटका करून घेऊ शकतात. निवडणुकीत पराभव झाल्यास न्यायालयाने शिक्षा दिल्यास त्यांना गजाआड जावे लागेल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, टीकाकारांनीही आगामी निवडणुकीमध्ये देशासमोरील आव्हानांऐवजी ट्रम्प केंद्रित मुद्द्यावर निवडणूक केंद्रित होण्याची शक्यता वर्तविली आहे. ट्रम्प यांनी आधीच माझ्यावरील दोषारोप म्हणजे माझ्या समर्थकांवरील दोषारोप आहेत, अशी हाकाटी पिटण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने ट्रम्प यांच्या दोषारोपांच्या मालिकेप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे ते सत्तेत आले तरी त्यांना शिक्षा होऊ शकते, अशी चर्चाही राजकीय जाणकार करीत आहेत.