Latest

DK Shivkumar: डीके शिवकुमारांचा डोळा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळावर?

रणजित गायकवाड

बंगळूर : पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील राजकीय नाट्य अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षाच्या हायकमांडला अद्याप निर्णय घेता आलेला नाही. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे दोघेही दिग्गज नेते असून ते मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत आहेत. दरम्यान, हायकमांडसाठी त्यातील एकाची निवड करणे अत्यंत अवघड ठरत आहे. डीके शिवकुमार हेही मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याचीही पक्षात चर्चा झाली. यावर डीके शिवकुमार यांनीही एक अट ठेवल्याचे समजते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवकुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ मला द्यावा, त्यानंतरचा सिद्धरामय्या यांना द्यावा. मला पहिली टर्म न मिळाल्यास मला काहीही नको. मी गप्प राहीन, असे म्हटल्याचे काहींचे म्हणणे आहे.

हायकमांडच्या कोर्टात चेंडू

डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी स्पष्ट नकार दिला आहे. आता काँग्रेस हायकमांडची बैठक होणार असून त्यानंतरच नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार आहे.

पक्षाचा 'वन मॅन शो' नकार

दरम्यान, सिद्धरामय्या किंवा डीके शिवकुमार या दोघांपैकी एकट्याने शपथ घेण्याला हायकमांडचा नकार आहे. राज्यात मिळालेले बहुमत हे सामूहिक नेतृत्वाचे यश असून 8-10 मंत्र्यांनी शपथ घेणे आवश्यक आहे. हायकमांडला आता कर्नाटकात 'वन मॅन शो' नको आहे. त्यामुळे सर्व शक्यतांवर आता पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

दोन्ही नेत्यांनी राहुल गांधी यांची घेतली भेट

कर्नाटकातील विजयानंतर दिल्लीत आलेले काँग्रेस नेते डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.

आता अजून २-३ दिवस लागणार?

या सर्व वादाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सध्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे विचारविनिमय करत आहेत. काँग्रेस जेव्हा निर्णय घेईल तेव्हा कळवू. येत्या 48 ते 72 तासांत कर्नाटकात नवे मंत्रिमंडळ असेल. विशेष म्हणजे, या रस्सीखेचीत डीके शिवकुमार यांनी दिल्लीतील त्यांचे भाऊ आणि खासदार डीके सुरेश यांच्या निवासस्थानी त्यांचे समर्थक आमदारांची भेट घेतली. शिवकुमार मुख्यमंत्री होण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजून निर्णय व्हायचा आहे

दिल्लीत सुरू असलेल्या या वातावरणात बुधवारी दुपारी सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या. सूत्रांवर विश्वास ठेवला तर काँग्रेस हायकमांडने या नावावर सहमती दर्शवली. ते उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचीही बातमी होती. मात्र, काही वेळाने रणदीप सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री पदाबाबत अजून निर्णय व्हायचा असल्याचे स्पष्ट केले.

यापूर्वी डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी मंगळवारी मल्लिकार्जुन खर्गे यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सिद्धरामय्या यांच्या उणिवा पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार यांनी खर्गे यांना सिद्धरामय्या यांचा मागील कार्यकाळ चांगला राहिला नसल्याचे सांगितले होते. लिंगायत समाजही त्याच्या विरोधात आहे. सिद्धरामय्या यांना आधीच मुख्यमंत्री बनवले आहे, त्यामुळे त्यांना परत संधी देऊ नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT