पुढारी ऑनलाईन डेस्क : वसुबारसनिमित्त (Vasu Baras) सगळीकडे चैतन्याची पालवी फुलली आहे. मंदिरांमध्येही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवा आनंद, नवा जोश आणि नवी ऊर्जा घेऊन वसुबारस साजरी केली जाणार आहे. वसुबारसच्या दिवशी सायंकाळी गाय- वासराचे पूजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने घरोघरी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदण्याची प्रार्थना करण्यात येईल. जाणून घ्या आज वसुबारसदिवशी गाय-वासराची पूजा (Vasu Baras puja) कधी करावी.
भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात 'वसुबारस' या दिवसापासून दिवाळी सुरू होते. गोवत्स द्वादशी या तिथीला वसुबारस साजरा केला जातो. घरातील गाय- वासरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. हिंदू धर्मात गाईला महत्त्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची वासरासह सायंकाळी पूजा केली जाते. घरात देवी लक्ष्मीचे आगमन व्हावे, या उद्देशानेही यादिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
सोमवार, दि. २८ रोजी वसुबारसने दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. आज गायवासराचे पूजन केले जाणार आहे. हिंदू धर्मात गाईला महत्त्व आहे. वसु म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी या अर्थाने समृद्धीचे प्रतीक असलेल्या गायीच्या पूजनाने दिवाळी सणातील इतर सोहळ्यांची नांदी होणार आहे. वसुबारसदिवशी गोपूजनाची शुभवेळ (Vasu Baras puja Time) २८ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपासून २९ ऑक्टोबरला द्वादशी तिथी समाप्ती सायंकाळी ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत आहे. दि. २९ रोजीच्या सकाळची वेळ गायवासरू पूजनासाठी सर्वोत्तम आहे. यानिमित्ताने गायवासराला आंघोळ घालून सजवण्याची प्रथा आहे. यावेळी गायवासराला नैवेद्य दिला जातो. महिला या दिवशी उपवास करुन कुटुंबाच्या व मुलाबाळांच्या सुखाची प्रार्थना करतात.