दिवाळीची चाहूल लागली कि सगळ्यांना खरेदी, फराळ, सजावट याचे वेध लागतात. वर्षातून एकदा येणाऱ्या या सणांच्या राजासाठी हरतऱ्हेने तयारी केली जाते. दिवाळीच्या दिवसांपैकी नरक चतुर्दशीदिवशी पहाटे अभ्यंगस्नान करणं याला अत्यंत महत्व आहे. सुगंधी तेल आणि उटणं यांच्या सहायाने नरक चतुर्दशीपासून अभ्यंग स्नानास सुरुवात केली जाते. आश्विन - कार्तिकमध्ये हवेतील बदल त्वचेला त्रासदायक ठरू नयेत यासाठी तेल आणि उटणं लावून अभ्यंग स्नान केले जाते.
बाजारात आज काल तेलाप्रमाणेच उटणंही अनेक प्रकारात उपलब्ध आहे. पण घरात अत्यंत कमी साधनात आणि योग्य प्रकारे केलेले उटणे कसे करायचे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुलतानी पावडर : 2 चमचे
चंदन पावडर : 2 चमचे
बेसन : 2 चमचे (थोडे जाडसर )
आंबे हळद : 2 चमचे
गुलाब पावडर (किंवा गुलाब पाणी ) :
लिंबाचा रस : 1 चमचा (आयत्या वेळी )
वाळा पावडर : 2 चमचे
दूध : 2 चमचे
सगळे कोरडे जिन्नस एकत्र करा.
पूड बनवून ठेवा.
उटणं वापरताना त्यात गुलाब पाणी, लिंबाचा रस आणि दूध मिसळा.
त्वचा संवेदनशील असेल तर लिंबाचा रस वापरला नाही तरी चालेल.