कोल्हापूर : दीपोत्सव म्हणजे प्रकाशपर्व! या प्रकाशपर्वाचा आरंभ गुरुवारी घराघरांत झाला. प्रकाशाची एक ज्योतही तेजाचा प्रकाश पसरवू शकते, असा संदेश देत नरकचतुर्दशी साजरी करण्यात आली. अभ्यंगस्नानाचा सुगंध देत आणि रांगोळीच्या पायघड्या घालत घरोघरी दिवाळीचे स्वागत करण्यात आले. वसुबारस, धनत्रयोदशीनंतर दिवाळीच्या आनंददायी वातावरणाला नरकचतुर्दशीने वेगळाच साज चढविला. लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशा सोहळ्यांनी दिवाळीचा आनंद पुढचे तीन दिवस द्विगुणित होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झालेल्या गर्दीने दिवाळीची चाहूल दिली होती. त्या खरेदीच्या उत्साहाला अधिक उंचीवर नेणार्या मांगल्य आणि चैतन्याने गुरुवारी कोल्हापूरकरांच्या मनात आनंदाचे असंख्य दीप प्रज्वलित केले. एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत अनेकांनी स्नेहबंध द़ृढ केला. सोशल मीडियावरही दिवाळी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यंदाही अनेक सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी माणुसकीचे दीप लावून दिवाळीला सामाजिक किनार दिली.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दिवाळी पाडवा शनिवारी साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने व्यापार्यांचे वहीपूजन होणार आहे. सकाळी 8 वा. 7 मिनिटांपासून ते 9. 32 पर्यंत, दुपारी 1.47 पासून 4.37 पर्यंत, सायंकाळी 6.03 पासून 7.37 पर्यंत तर रात्री 9 वर.12 मिनिटांपासून 12.22 पर्यंत शुभमुहूर्त आहे.