मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? Pudhari Photo
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग

Diwali Muhurt Trading | मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व, परंपरा आणि इतिहास

जाणून घ्या नक्की काय आहे मुहूर्त ट्रेडिंग ?

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी आता काही दिवसांवर आलेली आहे. खरेदी, घरांची सजावट, फराळ यांची लगबग घराघरांत दिसत आहे. दिवाळीमध्ये आणखी एका गोष्टीला विलक्षण महत्त्व असते ते म्हणजे मुहूर्त ट्रेडिंग. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजाराला सुटी असते, पण या दिवशी सायंकाळी काही वेळ हा मुहूर्त ट्रेडिंग असते. १९५७ पासून सुरू असलेल्या या प्रथेत देशभरातील गुंतवणूकदार उत्साहाने सहभागी होतात. (Diwali Muhurt Trading )

Diwali Muhurt Trading | मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास

भारतातील विविधता जगात अन्यत्र कोठेही दिसणार नाही. सण, उत्सव, प्रथा, परंपरा या सगळ्यांतून हे वैविध्य दिसत असते. मुहूर्त ही देखील अशीच एक परंपरा आहे, जे अनेक भारतीय पाळतात. लग्नापासून ते घरातील महत्त्वाच्या वस्तू खरेदी करतानाही मुहूर्त पाहिला जातो. महत्त्वाचे निर्णय आणि घटना यासाठी अनेक भारतीय मुहूर्तांवर अवलंबून असतात. हीच भावना शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणुकदार आणि ट्रेडर्स यांच्यातही दिसते, त्यामुळेच भारतीय शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची पद्धत आहे. मुहूर्त ट्रेडिंगच्या प्रथेची ही सविस्तर माहिती.

Diwali Muhurt Trading | अनेक शतकांची परंपरा

शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात १९५७ला झाली. पण प्रत्यक्षात या प्रथेचे मूळ अनेक शतके मागे जाते. हिंदू दिनदर्शिकेचा पहिला दिवस म्हणजे सामवत (Samvat) होय. त्यामुळे पहिल्या दिवशी केलेला शुभ व्यवहार संपूर्ण वर्षाची वाटचाल निश्चित करते अशी गुंतवणुकदारांत भावना असते.

१९५७पासून बाँबे स्टॉक एक्सचेंजमध्ये मुहूर्त ट्रेडिंगची प्रथा आहे. त्या काळी ऑनलाईन ट्रेडिंग अस्तित्वात नव्हते. त्यामुळे ट्रेडर्स नवे कपडे परिधान करून या विशेष तासाच्या ट्रेडिंगसाठी जमा होत असत. श्री महालक्ष्मीची कृपा लाभावी ही भावनाही मुहूर्त ट्रेडिंगमध्ये असते. अर्थात आता ऑनलाईड सर्व ट्रेडिंग होत असले तरी दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगचे महत्त्व कमी झालेले नाही. या ट्रेडिंगमध्ये ट्रेडर्स, गुंतवणुकदार थोडे शेअर्स तरी खरेदी करतात. तसेच व्यापारी, ब्रोकर्स नवे अकाऊंटही सुरू करतात. तसेच लक्ष्मीपूजन आणि वहीपूजनही केले जाते. मुहूर्त ट्रेडिंग आता ऑनलाईन होत असल्याने यात सहभाग घेणाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे. देशातील गुंतवणुकदार मोठ्या उत्साहाने या ट्रेडमध्ये सहभागी होतात. या पंरपरेतून भारतीय संस्कृती आणि अर्थविश्व यांच्यातील नाते प्रतित होते. (Diwali Muhurt Trading )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT