डोंबिवली : सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेसह दिवाळी सणाच्या आनंदावर विरजण पडू नये याकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सालाबादप्रमाणे यंदाही फटाके विक्रेत्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फटाक्यांचे स्टॉल लावण्याकरिता मोकळ्या जागा आणि मैदानांत व्यवस्था करण्यात आली आहे. विक्रेत्यांसह खरेदीदारांनी सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ठिकाणी फटाक्यांची खरेदी/विक्री करू नये, असे आवाहन केडीएमसीकडून करण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागामार्फत महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून प्राप्त झालेल्या मोकळी मैदाने/जागांच्या ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लावण्यास परवानगी दिली आहे. कल्याण पश्चिमेकडील स्वामी समर्थ मठ, यशवंतराव चव्हाण क्रिडांगण, देवळेकर मैदान, फडके मैदान, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी मैदान, माधव संकल्प शेजारील मोकळी जागा, कल्याण पूर्वेकडील दादासाहेब गायकवाड मैदान, मोहन्यातील एनआरसी कंपनीची मोकळी जागा, निमकर नाका, टिटवाळा पूर्वेकडील बायपास रोड, तसेच डोंबिवली पूर्वेकडील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल, पलाव्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदान आणि नेवाळी व द्वारली क्षेत्रातील मोकळी जागा, आदी ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तात्पुरते फटाके विक्रीचे स्टॉल लावण्याकरिता अग्निशमन ना हरकत दाखला देण्यात येतो. तथापी काही फटाके विक्रेता आवश्यक परवानग्या न घेता व महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेव्यतिरीक्त इतर कुठल्याही ठिकाणी फटाके स्टॉल उभे करुन फटाके विक्री करत असल्याचे निदर्शनास येते. अशा फटाके विक्रेत्यांवर महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागातील सहाय्यक आयुक्तांच्या मार्फत कारवाई करण्यात येते.
दिवाळीच्या सणानिमित्ताने तात्पुरते फटाके स्टॉल उभारणीकरिता अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आधारवाडी, टिटवाळा, ड प्रभाग, ह प्रभाग, एमआयडीसी व पलावा येथील अग्निशमन केंद्रांद्राकडे अर्ज सादर करणे अपेक्षित आहे.
फटाके स्टॉल विक्रीकरिता अर्जदाराचा अर्ज, जागेचा नकाशा, अग्निशमन नळकांडे बसविल्याचे प्रमाणपत्र, फटाके स्टॉलजवळ किमान 200 लिटर पाण्याचा साठा स्टॉलजवळ असणे इत्यादींची पूर्तता केल्यानंतर अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला वितरीत करण्यात येतो. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाने ना हरकत दाखला दिल्यानंतर फटाके विक्रेत्यांना बाजार व परवाना विभागाकडून फटाके विक्रीचा साठा परवाना घेणे आवश्यक राहील. संबंधित फटाके विक्रेत्यांनी सूचना आणि नियमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.