नाशिक : विविध आकार, प्रकार आणि सर्जनशील माध्यमांचा कल्पक वापर असलेल्या नक्षत्रासम सप्तरंगी आकाशकंदिलांनी शहरातील सर्वच बाजारपेठा लखलखल्या आहेत. यंदा गतवर्षीच्या तुलनेत यंदा आकाशकंदिलांच्या किमतीत १० टक्क्यांची वाढ झाली असूनही कंदिल खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साहही वाढत असल्याचे चित्र आहे.
आसमंत उजवळून टाकणाऱ्या कलात्मक आकाशकंदिलांशिवाय दीपोत्सव साजराच होत नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठेत आकाशकंदिलांची विस्तृत श्रेणी उपलब्ध झाली आहे. एमजीरोड, मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, गंगापूर रोड, कॉलेजरोडसह नवीन नाशिक भागात नक्षत्रांचा भास निर्माण करणाऱ्या आकाशकंदिलांनी बाजारपेठ सजली आहे.
यंदा पैठणी पॅटर्न, महिलांचे खण, ज्यूट, बांबू, बांबू, कापड यासहक व्हेलव्हेट, डिजीटल शिवमुंद्रा, रिफ्लेक्शन होणाऱे बांबूमधील नवीन पॅटर्नसह आकाशकंदिलांमध्ये विपूल वैविध्य अन् कलात्मकता दिसून येत आहे. चीनी बनावटांचे आणि थर्माकोलचे आकाशकंदिल हद्दपार झाल्याचेही चित्र आहे. पारंपरिक पद्धतीचे षट्कोनी, कागदी चांदणीच्या आकारातील कंदिलांमध्येही विविध आकार, प्रकार उपलब्ध आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा आकाशकंदिलांच्या किंमतीत १० ते १२ टक्के इतकी वाढ झाल्याची माहिती आकाशकंदिल विक्रेत्यांनी दिली.
यंदा किमतीत १० टक्के वाढ झाली आहे. विविध माध्यमातील आकाशकंदिल विक्रीसाठी आहेत. ग्राहकांचा खरेदीसाठी उत्साह चांगला असून पैठणीचा मोर, खण, बांबू, ज्यूटसह नवीन प्रकाराला अधिक मागणी आहे.प्रांजल देव, विक्रेते, नाशिक