कनाशी : गंगापूर येथे वाघदेव, नागदेव, सूर्य-चंद्र यांची पूजा करताना ग्रामस्थ.  (छाया : अनिल पवार)
दिवाळी

दिवाळी 2024 | वाघदेवतेच्या पूजेने आदिवासींच्या दिपोत्सवास सुरवात

आदिवासींच्या दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

कनाशी : बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळवण तालुक्यात वाघ देवतेच्या पूजनाने आदिवासींच्या दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला. तालुक्यातील गंगापूर, भारडमोक, गणोरे, करंभेळ, लिंगामे, आमदर, वंजारी यासह तालुक्यातील अनेक गावांतील शिवारात वाघदेवतेची पूजा करण्यात आली.

वाघबारशीच्या दिवशी गुरे चारणारे गुराखी (बाळदी) उपवास करतात व सायंकाळी सर्व ग्रामस्थ गावाच्या सीमेवर वाघदेवाजवळ एकत्र येऊन आदिवासी परंपरेनुसार पूजा केली जाते. यालाच वाघदेवाची चिरा किंवा पाटली असे संबोधले जाते. या वाघदेवाच्या पाटलीवर चंद्र, सूर्य, नागदेव, वाघदेव, मोर आदी चित्र कोरलेली असतात. वाघदेवाला या दिवशी प्रथमतः शेंदूर लावला जातो व दिवाळीच्या हंगामात शेतातील येणारे नवीन पिके म्हणजे नागली (कन्सरा), भात, बाजरी, वरई, उडीद, झेंडू आदी पिकांची कणसे वाहिली जातात. गावाच्या प्रथेनुसार भगतामार्फत तांदूळ, उडीद वाहून पूजा केली जाते. आदिवासी व त्यांच्या गुरे-ढोरे यांचे वन्यप्राण्यांपासून रक्षण व्हावे यासाठी वाघ देवाची पूजा केली जात असल्याचे ज्येष्ठ नागरिक निवृत्ती बागूल यांनी सांगितले.

गायीच्या रूपात लक्ष्मी

दिवाळीच्या पाच दिवसांत गायीच्या रूपाने घरात लक्ष्मी येते अशी आदिवासी समाजाची धारणा आहे. या दिवशी गुराखी कोणत्याही वाद्याचा वापर न करता धिंडवळीचे गाणे गातात. यात गाय, बैल, जंगलातील नागदेव, वाघदेव आदींचा गीतांतून उद्धार केला जाते.

आदिवासी समाज निसर्ग पूजक आहे. प्रत्येक सण उत्सव निसर्ग आणि त्याच्याशी संबंधित घटकांची पूजा केली जाते. वाघबारसला सुपाने नागली, भात, तांदूळ, बाजरी यांचे ईरा म्हणजे नैवेद्य दाखविला जातो.
संजय गावित, ज्येष्ठ नागरिक, गंगापूर, कनाशी, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT