आकाशकंदिलाचा प्रकाश, दिवे- पणत्यांची रोषणाई, फराळाचा आस्वाद आणि प्रथेप्रमाणे गाय-वासराचे पूजन अशा आनंदी वातावरणात सोमवारी वसुबारस घरोघरी साजरे झाले. आज (२९ ऑक्टोबर २०२४, मंगळवार) धनत्रयोदशी (Dhanteras 2024), यमदीपदान हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे. आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते.
घरातील अलंकार, सोने - नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यू म्हणजेच अकाली, अपघाताने मृत्यू येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा व घरातील प्रत्येकाने खालील श्लोक म्हणून दिव्यास नमस्कार करावा.
मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।
धर्मशास्त्रात एखाद्या व्रताविषयी ३-४ वचने असतात. अशा वेळेस त्यांचा समन्वय करुन उत्सवामध्ये एकवाक्यता आणणे सध्याच्या काळात खूप महत्वाचे आहे. याच विचाराने ग्रंथोक्त वचनांचा आधार घेऊन कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य पू. विजयेंद्र सरस्वती यांनी देखील १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे असे निवेदन केले आहे. महाराष्ट्रात दाते पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर, महाराष्ट्रीय पंचांग नागपूर, निर्णय सागर, सोमण पंचांग, स्वामी समर्थ पंचांग तसेच भारतातील जवळ जवळ १०० पेक्षा अधिक पंचांगात आणि अन्य सर्व कॅलेंडरमध्ये सुद्धा १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. तसेच आपण गेली अनेक वर्षे जे पंचांग किंवा कॅलेंडर वापरत आहोत, त्यामध्ये दिल्याप्रमाणे सण-उत्सव साजरे करावेत, संभ्रम करून घेऊ नये.
नरकासुराने १६ हजार १०८ स्त्रीयांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रीयांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.