नाशिक : दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. हा दिवस मंगळवारी उत्साहात साजरा होत आहे. अंगणात रांगोळी, दारी फुलांचे तोरण, फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने घरे उजळणार आहेत. (Dhanteras, also known as Dhanatrayodashi, is the first day that marks the festival of Diwali in most of India)
धनत्रयोदशीच्या दिवशी आरोग्यदेवता असलेल्या धन्वंतरीचे पूजन करण्यात येणार आहे. आयुष्यात सुख- समृद्धी आणि मांगल्य नांदण्याची प्रार्थना केली जाणार आहे. यानिमित्ताने नवीन वस्तूंच्या खरेदीचे शुभमुहूर्तही साधले जाणार आहे. या खास दिवशी महिला सोन्याची खरेदी करणार आहेत; तर मंदिरांमध्येही विद्युत रोषणाईसह विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. (Arogyam Dhansampada celebration)
धनत्रयोदशीच्या दिवशी व्यापारी वर्गाकडून विशेष पूजा केली जाते. त्यामुळे सायंकाळी व्यापारीवर्गाकडून खास पूजा करण्यात येणार आहे. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून व्यापारी सुरू करणार आहेत. त्याशिवाय दालनांमध्ये दिवे, पणत्या प्रज्वलित करण्यात येणार असून, घराघरांमध्ये विधिवत पद्धतीने पूजन करण्यात येणार आहे. सर्वांना चांगले सुदृढ आरोग्य अन् दीर्घायुष्याची कामना करण्यात येईल. यादिवशी खासकरून सोने खरेदीला प्राधान्य दिले जाणार आहे आणि काहीजण नवीन वाहनासह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीचे निमित्त साधणार आहेत. धनत्रयोदशीला काहीजण नवीन गृहप्रवेशही करणार आहेत.
अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने-नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यू म्हणजेच अकाली, अपघाताने मृत्यू येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा आणि घरातील प्रत्येकाने श्लोक म्हणून दिव्यास नमस्कार करावा, असे दाते पंचांगकर्तेचे मोहन दाते यांनी सांगितले.
धनत्रयोदशीला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर, धन्वंतरी यांची पूजा केली जाते. या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. धनत्रयोदशीला पारंपरिक पद्धतीने धन्वंतरी पूजन केले जाते. तसेच घरोघरी सर्व जुनी नाणी, सोने-चांदीचे दागिने, भांडी, ताह्मणे, तबके चकचकीत करून त्याचे पूजन करण्यात येते आणि सायंकाळी यमदेवतेचे पूजन केले जाते. यमदीपदान म्हणजेच दीप लावून दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. या दिवसाला व्यापारीवर्गाकडून विशेष पूजा करण्यात येते. या दिवशी सायंकाळी दुकानांमध्ये विधिवत पद्धतीने पूजा करावी. धनत्रयोदशीला सोन्या-चांदीचे दागिने, भांडी आणि घरगुती वापरासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतात.