डोंबिवली; भाग्यश्री प्रधान आचार्य : Diwali special- कोणाचं गाव निसर्गरम्य असतं तर कोणाच्या गावातील कुस्तीचा फड प्रसिद्ध असतो. कोणाच्या गावात भुताच्या गोष्टी प्रसिद्ध असतात. तर कोणाच्या गावातील जत्रा हा त्या गावातील गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. वांगणी (जि. ठाणे) या गावातील असंच एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात राहणारे जावई. या गावाला जावयांचे गाव म्हणून संबोधले जाते. हे समजल्यानंतर या गावातील प्रथा, परंपरा, राहणीमान जाणून घेण्याची उत्सुकता होती. मात्र येथे गेल्यानंतर गावातील मुलींप्रमाणेच या गावातील जावयांनी देखील या गावाला आपलेसे करून घेतल्याचे निदर्शनास आले.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा माहोल संपून सर्वानाच दिवाळीची चाहूल लागली होती. त्यामुळे दिवाळीच्या उत्सवाबरोबरच गावातील नागरिकांमध्ये असलेली आपुलकी अनुभवायला मिळाली. प्रत्येक गावात पाहुण्यांची ज्याप्रमाणे सरबराई होते त्याचप्रमाणे आमची देखील सरबराई करण्यात आली. आम्ही गेलो त्या दिवशी वसुबारस हा दिवस होता. त्यामुळे प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी काढण्याचे काम महिला करत होत्या. संस्कार भारती रांगोळीतील रंगानी आजूबाजूचे वातावरण देखील प्रसन्न झाले होते. घरांमधून येणारा बेसन भाजण्याचा सुवास वातावरणात दरवळला होता. या गावाने आपलेसे करून घेतलेले जावई देखील घरात महिला वर्गाला साफ सफाई करण्यास हातभार लावत होते. स्वतःचे गाव सोडून सोयी सुविधांनी युक्त अशा वांगणी गावात आलेल्या जावयांनी या गावातील माणसांना आपल्या मधुर वाणीने आणि सुस्वभावाने आपलेसे केले असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वांगणी गावाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 20 ते 25 टक्के लोकसंख्या ही जावयांची आहे. पूर्वीपासून हे गाव निसर्गरम्य आहे. या गावात बारमाही वाहणारी उल्हासनदी असल्याने पाण्याची टंचाई नाही. मध्य रेल्वेचे हे महत्त्वाचे स्थानक असून दळण वळणाची सुविधा येथे आहे असे ते सांगतात. आमची गावे लांब असून गावामध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात होती. आपली मुलगी देताना पाण्यासाठी तिचे कोणतेही हाल होऊ नये असे वाटत असे. त्यामुळे मुलींचे पालकच आमच्या गावी येऊन राहा असे सुचवत. त्यामुळे या गावातच आमचे संसार बहरले असे सांगताना त्यांनी आई वडिलांना सुद्धा या गावातच राहायला घेऊन आल्याचे त्यांनी नमूद केले. तर काहीजण त्यांच्या पालकांच्या भेटायला आपापल्या गावी जात असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. अनेक वर्षांची परंपरा पुढेदेखील अशीच सुरू राहील यासाठी त्यांनी आशा व्यक्त केली.
मात्र अनेक जण जावई घरी राहायला येतो. त्यावेळी त्यांना घर जावई म्हणून हिणवले जाते. मात्र या गावात वर्षानुवर्षे राहणाऱ्या जावयांचा सन्मान केला जात असल्याने या गावातील मुली देखील खुश असतात. मुली खुश असल्या की लक्ष्मी प्रसन्न होते असे मानणाऱ्या या गावात अगदी खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले. (Diwali special)
हेही वाचलंत का?