दिवाळी हा देशातला सगळ्यात मोठा सण. त्याची सुरुवात वसुबारसने आजपासून होत असून अवतीभवतीच्या अनेक प्रकारच्या अंधारांवर मात करून लोक दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. महागाई आकाशाला भिडली असली, तरी सणासुदीच्या खरेदीचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. गेले काही दिवस दिवाळी खरेदीसाठी बाजारांमध्ये होणारी गर्दी पाहिल्यानंतर या उत्साहाची कल्पना येऊ शकते. सामान्यातली सामान्य माणसेही आपल्या मुलाबाळांच्या अंगावर नवी कपडे असावीत म्हणून खरेदी करताना दिसतात. छोट्या प्रमाणात फटाके, फुलबाजे घेतात. सामान्य कष्टकर्यांपासून गर्भश्रीमंतांपर्यंत सगळ्या थरातल्या लोकांना दिव्यांच्या उजेडात न्हाऊ घालणारा सण म्हणून दिवाळीचे जरा जास्तीच कौतुक असते. घरोघरी दिव्यांच्या ओळी लावून हा सण साजरा केला जातो म्हणून त्याला दीपावली किंवा दिवाळी म्हणतात.
दिवाळी हा जसा दिव्यांच्या सामूहिक झगमगाटाचा उत्सव असतो, तसाच तो पाच सणांचा मिळून एक उत्सव असतो. वसुबारसमधील वसू म्हणजे धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. गोवत्स द्वादशी असेही त्याला म्हणतात. या दिवशी घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सवत्स धेनूची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला वैद्य शिरोमणी धन्वंतरी यांचा जन्म झाला. त्यामुळे या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. रात्री घराच्या उंबरठ्यावर दिवा लावला जातो. त्यानंतरची नरक चतुर्थी म्हणजे पौराणिक कथेनुसार या दिवशी अत्याचारी दैत्य नरकासुराचा वध केला. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी या दिवशी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. लंका विजयानंतर यादिवशी प्रभू रामचंद्र आयोध्येत परतले होते. याच दिवशी धन-दौलतीची देवता लक्ष्मी प्रकट झाली होती म्हणून लक्ष्मीचे पूजन केले जाते. गोवर्धन पूजन ही उत्सवातील पुढची शृंखला. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर पेलून त्याखाली गोकुळवासीयांना आश्रय देऊन त्यांचे रक्षण केले होते. यातील पाचवा आणि महत्त्वाचा सण भाऊबीजेचा. बहीण-भावाचे नाते द़ृढ करणारा हा सण दिवाळीच्या आनंदातील परमोच्च बिंदू मानला जातो. लहानथोर सगळ्यांना सामावून घेणारा आणि गरीब-श्रीमंत असा भेद न करता सर्वांवर प्रकाशाची बरसात करणारा सण म्हणून दिवाळीला चैतन्यपर्व म्हटले जाते. सणाला मोठी परंपरा आहे आणि काळही झपाट्याने बदलत चालला आहे. काळाबरोबर पारंपरिक सणांचे संदर्भही बदलत चालले आहेत. सणांना सामाजिक संदर्भ जोडून ते साजरे केले जात आहेत. माणसामाणसांमधील अंतर वाढत चालले असताना बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा, परस्परांतील प्रेम वाढवण्याचे निमित्त म्हणूनही या सणाकडे पाहिले जाते. छोट्या दिवाळी भेटकार्डंपासून ते महागड्या दिवाळी भेटवस्तूंपर्यंत भेटी देऊन व्यवसाय वृद्धिंगत करण्याचे प्रयत्नही दिवाळीनिमित्त केले जातात.
सामाजिक जाणिवा विकसित करण्यासाठीचे प्रबोधनही याच कालखंडात केले जाते. आनंदाच्या जल्लोषात त्याचीही गरज असतेच. आतषबाजी हे मूळचे फक्त दिवाळीचे वैशिष्ट्य; परंतु कोणत्याही विजयाच्या जल्लोषात फटाके हा अविभाज्य भाग बनला. अलीकडच्या काळात पर्यावरणाचे प्रश्न गंभीरपणे समोर येऊ लागले आहेत. फटाक्यांमुळे होणारे आवाजाचे प्रदूषण आणि धुराचे प्रदूषण या दोन्हींचे मानवी आरोग्याला असलेले धोके समोर आले आहेत. त्यामुळे फटाक्यांच्या वापरावरील मर्यादेसंदर्भातील जाणीवजागृती व्यापक पातळीवर केली जाते. राजधानी दिल्लीसारख्या शहरात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असल्यामुळे तेथे फटाक्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईतही फक्त तीन तासच फटाक्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु, प्रदूषण हा काही फक्त दिल्ली आणि मुंबईपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. छोट्या छोट्या शहरांमध्येही प्रदूषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य वाढू लागले आहे. प्रदूषणामुळे श्वसनविषयक आजारांचे वाढत चाललेले प्रमाण हे त्याचे परिमाण आहे. त्यामुळे सगळ्यांनीच जबाबदारीचे भान ठेवून दिवाळीतील उत्साहाला नियंत्रित ठेवण्याची आवश्यकता आहे.
प्रदूषणाचा प्रश्न हा सगळ्यांनाच भेडसावणारा असल्यामुळे त्याबाबत मर्यादांचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे. दिवाळीचा फराळ म्हणजे गोडधोड. गोडधोड फक्त आपल्या घरात न खाता ते शेजारी-पाजारी देऊन सामाजिक संबंध निकोप बनवण्याचे प्रयत्न पूर्वापार होत आले आहेत. त्यातून समाजाची वीण घट्ट होणारच आहे; परंतु अलीकडच्या काळात त्याला सामाजिक संदर्भ जोडताना ज्या ठिकाणी दिवाळी फराळ तयार होत नाही, अशा ठिकाणी त्याचे वाटप करण्यासाठीही अनेक व्यक्ती संस्था, पुढाकार घेतात. मग, ते गरीब, निराश्रित लोकांची राहण्याची ठिकाणे असोत की विविध उपेक्षित घटकांसाठीची वसतिगृहे. अशा ठिकाणी फराळ वाटप करून उपेक्षित घटकांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेतले जाते. देशाच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा देणार्या सैनिकांसाठी दिवाळीचा फराळ पाठवण्याचा उपक्रम काही सामाजिक संस्था राबवतात. मुलांच्या कल्पकतेला आणि कलात्मकतेला वाव देणारा सण म्हणूनही दिवाळीकडे पाहिले जाते.
आकाशकंदील बनवणे हे कलात्मक आव्हान असते आणि विविध घटकांतील मुले त्यामध्ये आपले कौशल्य दाखवून कमाई करीत असतात. दिवाळीतला प्रकाश द्विगुणित करणार्या पणत्या विक्रीसाठी येतात. त्यांची खरेदी करून कष्टकर्यांची दिवाळी आनंददायी करण्याची संधी शक्य त्यांनी घ्यायला हवी. मंदपणे तेवणार्या आणि आपल्या उजेडाने भोवताल उजळून टाकणार्या पणत्या अनेक ठिकाणी दिसत असतात. या पणत्या तेवत राहतील, याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची आवश्यकता आहे. दिव्यांनी नुसता आसमंत उजळून निघणे पुरेसे नाही, तर हे दिवे अंधाराच्या तळाशी लागले पाहिजेत. अंधार समूळ नष्ट करण्याचे काम त्यांनी केले पाहिजे. आपल्या मनातला अंधकार दूर करून प्रकाशाकडे झेपावण्याबरोबरच इतरांच्या मनातील अंधार दूर करण्यासाठीही प्रयत्न करावयास हवेत. अवतीभवतीचा अंधार नष्ट करण्यासाठीची जाणीव प्रत्येकाने मनात बाळगली, तर खर्या अर्थाने प्रकाशाचा हा उत्सव सार्थकी लागला, असे म्हणता येईल.