विज्ञान संशोधनांमध्ये स्त्री-पुरुष यशस्वितेची दरी जाणवते. याचे प्रमुख कारण म्हणजे स्त्रियांना सर्वकाळ उपेक्षित ठेवणारी समाजव्यवस्था होय. स्त्रियांना शिक्षणाची समान संधी नाकारणे, कौटुंबिक जबाबदारीचे ओझे, पुरुषी वर्चस्वाचे जोखड ही कारणेही आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर हीच परिस्थिती आहे. विज्ञान संशोधनाची दारे आज महिलांना समानतेने प्रवेश देत असली, तरी अनेक संधी त्यांना नाकारण्यात येतात…
भारतीय विज्ञान परिषदेचे 108वे अधिवेशन नागपुरात नुकतेच पार पडले. ब्रिटिश संशोधक जे. एल. सायमन्सन आणि पी. एस. मॅकमोहन यांच्या पुढाकारातून इंडियन सायन्स असोसिएशन स्थापन झाली. भारतात वैज्ञानिक द़ृष्टिकोन रुजावा, दरवर्षी भारतातील संशोधकांनी एकत्र यावे, सादर होणारे शोधनिबंध एकत्र प्रकाशित करावेत, विज्ञान प्रसारासाठी निधी जमवावा, संशोधनास गती मिळावी, ही त्यामागील प्रमुख उद्दिष्टे आहेत. हे अधिवेशन दरवर्षी भरते; त्याची मोठी चर्चाही होते. मात्र या परिषदेतील महिला संशोधकांचा अल्प सहभाग हा चिंतेचा विषय आहे.
मानवी प्रगतीमध्ये महिलांची भूमिका कायमच महत्त्वाची आहे. जागतिक स्तरावरील गरिबी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण इत्यादी प्रश्नांवर लढा उभारण्यात महिलाच आघाडीवर आहेत. सर्जनशीलता आणि नियमन या दोन्ही गोष्टी महिलांच्या सहभागाखेरीज होऊ शकत नाहीत, हे निर्विवाद सत्य असले तरीही महिलांना समानतेची वागणूक आणि संधी सातत्याने नाकारण्यात आल्या. जगात साधारण अकरा हजार वर्षांपूर्वी शेती करण्यास महिलांनीच सुरुवात केली. डीडीटी आणि कीटकनाशकांचे दुष्परिणाम सांगणारीही महिलाच होती. असे असूनही विज्ञान तंत्रज्ञान आणि एकूणच संशोधनाच्या क्षेत्रांमध्ये महिलांचे प्रमाण कमी दिसते. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचे कार्य कमी दिसून येते. मात्र त्याला गुणवत्ता हे कारण नसून त्यांना नाकारण्यात येणार्या संधी, हेच महत्त्वाचे कारण आहे.
जागतिक पातळीवर नोबेल पुरस्कार संशोधकीय कर्तृत्वाचा मापदंडच. 1901पासून आजपर्यंत अवघ्या 58 महिलांना नोबेल मिळाले. मारी क्युरींना ते दोनदा मिळाले. साहित्यासाठीच्या सर्वाधिक 117 नोबेल पुरस्कारांत 13.7 टक्के तर शांततेसाठीच्या पुरस्कारांत 12.6 टक्के महिला आहेत. विज्ञान संशोधनातील नोबेल विजेत्यांत हे प्रमाण खूपच कमी आहे. वैद्यकशास्त्रासाठीच्या विजेत्यांत 5.4 टक्के, रसायनशास्त्रात 3.8 टक्के तर भौतिकशास्त्रातील अवघे 1.9 टक्के आहे.
'कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च' या संस्थेमार्फत दरवर्षी दिले जाणारे भटनागर पारितोषिक भारतातील संशोधनाचे परिमाण मानले जाते. यातील स्त्रियांचे प्रमाण वाढत असले तरी अद्याप दहा टक्क्यांपर्यंतही गेलेले नाही. 2017 मध्ये 'करन्ट सायन्स'ने प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधानुसार एकूण 525 विजेत्यांमध्ये 509 पुरुषांना, तर केवळ सोळा महिलांना या पुरस्काराने सन्मानित केल्याची माहिती आहे.
महिलांचे प्रमाण फक्त भटनागरच नव्हे, तर नोबेल पुरस्कारांतही वाढले आहे. 1901 ते 1920 या वीस वर्षांच्या कालखंडात केवळ चार महिला नोबेल पुरस्कार विजेत्या होत्या. (यात मारी यांचे दोन पुरस्कार) पुढील वीस वर्षांत (1921 ते 1940) पाच महिला विजेत्या होत्या. त्यापुढच्या काळात दुसर्या महायुद्धामुळे काही वर्षे नोबेल देण्यात आले नाहीत. त्यावेळी तीन महिलांना नोबेल मिळाले. 1941 ते 1960 या वीस वर्षांत सात महिलांनी नोबेल मिळविले. त्यापुढील वीस वर्षांत (1981 ते 2000) 11 महिला नोबेल विजेत्या ठरल्या. 2001 ते 2020 मध्ये हा आकडा 21 झाला.
विज्ञान संशोधनांमध्ये स्त्री-पुरुष यशस्वितेची दरी जाणवते याचे प्रमुख कारण म्हणजे स्त्रियांना सर्वकाळ उपेक्षित ठेवणारी समाजव्यवस्था होय. स्त्रियांना शिक्षणाची समान संधी नाकारणे, परक्याचे धन मानून शिक्षण संधींपासून वंचित ठेवणे, कौटुंबिक जबाबदारीचे ओझे, पुरुषी वर्चस्वाचे जोखड ही कारणेही आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर हीच परिस्थिती आहे. विज्ञान संशोधनाची दारे आज महिलांना समानतेने प्रवेश देत असली, तरी अनेक संधी त्यांना नाकारण्यात येतात. विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रातील ही दरी जागतिक पातळीवर वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
घरातील परिस्थिती बेताची असेल आणि मुलगी कितीही हुशार असली तरी मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जाते. आज असा भेदभाव करणार्या पालकांचे प्रमाण कमी झाले असले, तरी ही दरी पूर्णत: संपलेली नाही. अलीकडे हा भेदभाव मिटत असल्याचे उच्च शिक्षणातील आकडेवारीवरून दिसते. जगभरातील विज्ञान क्षेत्रात संशोधन करणार्या महिलांचे प्रमाण 28.6 टक्के असल्याचे 2017 मध्ये प्रसिद्ध झालेला 'युनेस्को'चा अहवाल सांगतो. म्हणजेच जागतिक पातळीवर ही दरी मोठी आहे.
सामाजिकदृष्ट्याही शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देताना मोठ्या प्रमाणात भेदभाव करण्यात येत असे. जानकी अम्मल यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेणे म्हैसूर प्रांतात आश्चर्य ठरले होते. पुढे त्या जगप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ बनल्या. कमला सोहोनी यांना बेंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत मुलगी असल्याने प्रवेश नाकारला होता. कमला यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर अनेक जाचक अटी घालून प्रवेश दिला. मेरी डेल शिल्टन यांना अमेरिकेत खगोलशास्त्र अभ्यासक्रमास प्रवेश नाकारण्यात आला होता. मारी क्युरींनाही फ्रान्समधील सॉबर्न विद्यापीठात प्रवेश नाकारलेला होता. परदेशात महिलांना साहित्यनिर्मितीही करता येत नव्हती. म्हणजेच जगातील बहुतांश देशांमध्ये महिलांना शिक्षणाच्या संधी देण्याबाबत असमानता आणि असहकाराचे धोरण अवलंबले जात असे.
लग्न झाल्यानंतर घर सांभाळणे हेच बायकांचे काम अशा मानसिकतेत अजूनही समाज बद्ध आहे. स्वयंपाक, स्वच्छता, वृद्धांची सेवा, मुलांचे संगोपन अशा घरकामांत महिलांना गुंतवून ठेवले जाते. म्हणूनच जानकी अम्मल यांनी लग्न न करता आयुष्य संशोधनालाच वाहिले. कमला सोहोनी यांनी संशोधनाला हरकत न घेणार्यासोबतच विवाह केला. पिअरे यांनी तर संशोधनासाठीच मारी यांच्याशी विवाह केला. असा जोडीदार मिळणार्या महिला कमीच.
आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे वयाच्या तीस ते चाळीस या कालखंडात विविध संशोधकांनी लावलेल्या शोधांना बहुतांश नोबेल मिळाले आहेत. महिला या वयात मुलांचा जन्म आणि संगोपन यात गुंतलेल्या असतात. संशोधनदृष्ट्या सर्वाधिक उमेदीचा काळ त्यांचा कौटुंबिक जबाबदार्यांत जातो.
जगभरातील अनेक महिला संशोधकांना कामाच्या ठिकाणी मोठा त्रास झाला आहे. जानकी अम्मल यांनी त्यामुळेच 1940 मध्ये भारत सोडून इंग्लंडमध्ये संशोधन करण्याचा निर्णय घेतला. पुढे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या विनंतीवरून त्या 1951 मध्ये भारतात परतल्या. बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या महासंचालक बनल्या. कमला सोहोनी यांनीही पुरुषी मानसिकतेतून होणार्या त्रासामुळे दिल्लीतील नोकरी सोडली. जगातील अनेक देशांत हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात आहे. अमेरिकेतील बार्बारा मॅक्लिटांकसह अनेक महिला संशोधकांच्या चरित्रात असे प्रसंग जागोजागी दिसतात.
जागतिक पातळीवर अनेक प्रसंग असे आहेत की, मूळ संशोधन महिलांनी केले, मात्र पुरुष सहकार्यांनी त्यांना श्रेयापासून वंचित ठेवले. लिझ माईटनर यांनी अणू विखंडानाची प्रक्रिया कशी होते, ते शोधले. ऑटो हान यांनी तिच्या कल्पनेप्रमाणे केलेल्या अणू विभंजन प्रयोगाबाबत कळवले. मात्र काय झाले, हे नेमके समजत नसल्याचेही लिहिले. याला उत्तरादाखल माईटनर यांनी ऑटो हान यांना चित्ररूपात प्रक्रिया पाठवली. त्याप्रमाणे ऑटो हान यांनी शोधनिबंध लिहून प्रसिद्ध केला. पुढे या शोधाला नोबेलही मिळाला. मात्र हान यांनी कोठेही माईटनर यांचा उल्लेख केला नाही. एका तपानंतर या शोधाचे श्रेय माईटनर यांना दिले पाहिजे, हे पुराव्यासह जगाच्या लक्षात आले. मात्र त्यावेळी माईटनर यांचे निधन झाले होते.
वॅटसन आणि क्रिक यांनीही ज्या छायाचित्राच्या सहाय्याने डीएनएची नेमकी रचना मांडली आणि नोबेल मिळवले, ते छायाचित्र प्रत्यक्षात रोझालिंड फ्रँकलिन या संशोधिकेने घेतले होते. हे छायाचित्र तिच्या अपरोक्ष ड्रॉवरमधून घेऊन त्यांनी अभ्यासले. त्यावर शोधनिबंध प्रकाशित करून नोबेल मिळवले. मात्र मूळ संशोधिकेचा नामोल्लेखही टाळला. इस्थर लिडरबर्ग या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ महिलेच्या शोधाचे श्रेय तर तिच्या नवर्यानेच लाटले. बीटा कणांबाबतच्या संशोधनासाठीच्या नोबेल पुरस्कारापासून चिनी संशोधिका चिन शींग वू हिलाही तिच्या सहकारी संशोधकांनी दूर ठेवले. अशा अनेक संशोधनाचे श्रेय महिलांपासून पुरुष वैज्ञानिकांनी हिरावले आहे.
लैंगिक, धार्मिक आदी विविध बंधनांचे कुंपण घालून पुरुषांनी महिलांना संधी नाकारल्या. एकोणिसाव्या शतकामध्ये संधींची दारे त्यांच्यासाठी किलकिली झाली. मात्र आजही ती पूर्ण उघडलेली नाहीत. आज महिला शिक्षणाच्या बळावर कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. त्या कर्तृत्वावर विविध पुरस्कारांची मोहोरही उमटत आहे. ते पाहता आगामी काळात आपल्या संशोधकीय कर्तृत्वाने त्या जगावर अधिराज्य गाजवतील, याची खात्री वाटते.
डॉ. व्ही. एन. शिंदे