पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहर व परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचलेले असताना अनेक घरांमध्ये आणि इमारतींमध्ये पाणी शिरलेले असताना महापालिकेकडे केवळ 38 ठिकाणीच पाणी साचल्याची नोंद आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कामे केल्याचा दावा करणार्या प्रशासनाचे आणि आम्ही सज्ज आहोत, असा दावा करणार्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पितळ उघडे पडले आहे.
मागील काही दिवसांपासून शहर व परिसरात कमी-जास्त पावसाची हजेरी लागत आहे. मात्र, रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार व दमदार पावसामुळे शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तसेच, अनेक बैठ्या घरांमध्ये आणि सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी साचले. अनेक ठिकाणी झाडे आणि भिंती पडल्या. पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडालेली असताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे केवळ 59 तक्रारी आल्याची नोंद आहे. त्यामध्ये घर, इमारत व सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याच्या 38 घटना, झाड पडल्याच्या 11 घटना, भिंत पडल्याच्या 10 घटनांचा समावेश आहे.
व्यवस्थापन कक्षात तीन शिफ्टमध्ये 1 लिपिक, 1 शिपाई सतत कार्यरत राहतील अशी व्यवस्था आहे. परंतु, ऐन आपत्तीच्या वेळी महापालिकेने जाहीर केलेले फोन नंबरही लागत नाहीत. तर क्षेत्रीय कार्यालयस्तरावरील अधिकारी यांचे मोबाईल क्रमांक स्विच ऑफ दाखवितात. आपत्ती व्यवस्थापन हा चौवीस तास कार्यरत असणे अपेक्षित आहे. मात्र, रविवारी सुटीच्या दिवशी या विभागात व्यवस्थापन प्रणालीचा अभाव दिसून आला. आपत्ती व्यवस्थापन विभाग हा केवळ अग्निशमन दलावरच विसंबून असल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे, कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढून तीन महिन्यांपूर्वी नालेसफाई, पावसाळी लाइनची सफाई करण्यात आली. परंतु, महापालिकेच्या पथ विभागातील काही अधिकार्यांना रस्त्याच्या बाजूच्या पावसाळी लाइनविषयी विचारले असता त्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याचे समोर आले.
क्षेत्रीय कार्यालयांकडील नाले, ओढ्यांवरील ब्लॉकेज ठिकाणांची पाहणी करून संबंधित यंत्रणेने कार्यवाही करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी ओढेच बुजविले आहेत, अनेक ठिकाणी त्यांची रुंदी कमी केली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवर येते. यावर ठोस उपाययोजना न करता प्रशासनाकडून काणाडोळा केला जातो.
कमी वेळेत रविवारी सायंकाळच्या सुमारास जास्त पाऊस झाल्याने अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर साचते अशा ठिकाणांची पाहणी करून दीर्घकालीन योजना केल्या जातील. सध्या अशा आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोहचविण्यास प्राधान्य आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागातील जे अधिकारी, कर्मचारी मोबाईल बंद करून ठेवतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
– सचिन इथापे, उप आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका