Latest

काँग्रेसकडून युवकांची घोर निराशा, उदयपूर शिबिरातील निर्णय धाब्यावर

Arun Patil

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात राजस्थानातील उदयपूर येथे काँग्रेसचे चिंतन शिबिर पार पडले आणि त्यातील निर्णयांवरील शाई अजून ओली असतानाच हे निर्णय पद्धतशीररीत्या धाब्यावर बसवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्ष प्रमुख सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या खुशमस्कर्‍यांचीच काँग्रेसमध्ये आजही चलती असल्याचे राज्यसभेसाठी जाहीर झालेल्या उमेदवारीवरून सिद्ध झाले आहे. या जुन्या खोडांनीच राज्यसभेच्या जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आणि युवकांच्या तोंडाला त्यामुळे पाने पुसली गेली आहेत.

पक्षाची पुनर्रचना आणि संघटनेत चैतन्य आणण्यासाठी राहुल गांधी यांनी पन्नास टक्के पदे युवकांना दिली जावीत, अशी संकल्पना उदयपूर शिबिरात मांडली होती. वास्तवात ती संकल्पना केवळ कागदावरच उरल्याचे ठळकपणे दिसू लागले आहे. हे कमी म्हणून की काय पक्षाच्या तीन प्रमुख समित्यांवरदेखील तथाकथित जुन्या मंडळींनी आपली वर्णी लावून घेतली आहे.

काँग्रेसमध्ये राजकीय व्यवहार समिती महत्त्वाची मानली जाते. फक्त या समितीचाच विचार केला तर असे दिसून येते की, त्यामध्ये पन्नास वर्षांखालील एकाही व्यक्तीचा समावेश नाही. खुद्द राहुल गांधी हेही 51 वर्षांचे आहेत. ते देखील स्वतःला युवा म्हणवू शकत नाहीत. पक्षात वर्षांनुवर्षे ठाण मांडून बसलेले म्हातारे अर्क चलाख आणि बेरकी आहेत. जेव्हा उदयपूर चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी युवकांना पन्नास टक्के पदे देण्याचा विचार मांडला तेव्हा या मंडळींनी टाळ्यांचा गजर करून त्यासाठी माना डोलवल्या. मात्र, जेव्हा या निर्णयाची कार्यवाही करण्याची वेळ उभी ठाकली तेव्हा याच लोकांनी निलाजरेपणाने या निर्णयाचे श्राद्ध घातले.

काँग्रेसमधील तथाकथित ज्येष्ठ मंडळींना विद्यमान वातावरणाशी जुळवून घ्यावे असे वाटते तर राहुल गांधी यांचा भर आहे तो पक्षाच्या ध्येय धोरणे आणि विचारधारा निग्रहाने राबवण्यावर. त्यामुळेच एकीकडे मोदी सरकार आणि दुसरीकडे पक्षातील जुनी मंडळी अशा दोन्ही आघाड्यांवर राहुल गांधी यांना लढावे लागत आहे.

राहुल गांधी एकांडा शिलेदार 

राहुल गांधी यांच्यात अजून स्व. राजीव गांधी अथवा सोनिया गांधी यांच्याएवढी प्रगल्भता आलेली नाही हे खरे असले तरी हळूहळू पक्ष संघटनेवर ते मजबूत मांड ठोकू लागले आहेत. त्यामुळेच ते आपल्या आवडीचे सहकारी निवडू शकतात. राहुल गांधी हे जमिनीवरील वास्तवाबद्दल अनभिज्ञ आहेत असे बोलले जाते. तथापि, ते सातत्याने पक्षकार्यासाठी देशभर प्रवास करत असून आम जनतेत मिसळत आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

याच्या उलट जुने ढुढ्ढाचार्य दिल्ली आणि अन्य महानगरांतील आलिशान वातानुकूलित दालने उबवताना दिसतात. मोदी सरकारविरुद्ध लढणारा एकांडा शिलेदार अशी राहुल गांधींची प्रतिमा बनली आहे. गेल्या आठ वर्षांपासून त्यांचा हा संघर्ष सुरू आहे. म्हटले तर राहुल गांधी यांचे हे मोठे यश आहे. काँग्रेसमधील अन्य एकही नेता मोदी सरकारविरोधात ब्रसुद्धा उच्चारताना दिसत नाही हे विशेष.

ज्येष्ठांचेच आजही वर्चस्व

उदयपूर चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी अशी संकल्पना मांडली होती की, पक्षातील विविध पदे निवडणुकांच्या माध्यमातून भरली जावीत. मात्र, कथित ज्येष्ठांनी त्या शिबिरातच त्यांचा हा विचार उधळून लावला आणि पक्षात परंपरेने चालत आलेल्या नियुक्ती संस्कृतीची भलामण केली. राहुल गांधी यांनी येत्या ऑक्टोबरमध्ये पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका पार पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी सोनिया गांधी यांची इच्छा आहे.

पण, जुन्या खोडांना कठोरपणे बाजूला केल्याखेरीज राहुल गांधी यांना पुढील वाटचाल करणे केवळ अशक्य आहे. राज्यसभेसाठी पक्षाने जाहीर केलेले उमेदवार हाच याचा पुरावा होय. जसे की, स्थानिक चेहरा असलेल्या मुकुल वासनिक यांना महाराष्ट्रातून सहज उमेदवारी देता आली असती. तथापि, तिथे इम्रान प्रतापगढी या उत्तर प्रदेशातील जनाधार नसलेल्या नेत्याला उमेदवारी देण्यात आली. तसेच वासनिक यांना राजस्थानातून उमेदवारी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांचीही राजस्थानातून राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली आहे. आता तेव्हा 10 जून रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील तेव्हाच काय सारे चित्र स्पष्ट होईल. बंडखोरीचे निशाण फडकावलेले गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांचा पत्तादेखील असाच कापण्यात आला आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीला असलेला या मंडळींचा कडवा विरोध.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT