Latest

Diabetes : मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी ‘हे’ आहेत ६ उपाय

मोहन कारंडे

डॉ. संजय गायकवाड

शरीरात साखरेचे प्रमाण कमी-जास्त होणे म्हणजे मधुमेही रुग्णांच्या द़ृष्टीने आफतच. वारंवार उद्भवणारे असे प्रसंग काही पथ्ये पाळून आपण सहज टाळू शकतो. आहारतज्ज्ञ त्यासाठी सहा उपाय सुचवितात. ते अमलात आणल्यास साखरेच्या प्रमाणाचे शरीरात संतुलन राहते. तसेच इन्शुलिनचा नैसर्गिक स्राव नियमित होऊन रुग्णावर अचानक बाका प्रसंग उद्भवत नाही.

विकतचे खाद्यपदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक्सच्या माध्यमातून आपल्या शरीरात सर्वाधिक प्रमाणात साखरेचा शिरकाव होतो, हे आपल्याला ठाऊक आहेच. या जादाच्या साखरेचा शरीराला काहीही फायदा नसतो; उलट अमेरिकन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, या साखरेमुळे घातक कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात तयार होतात. त्यामुळे भविष्यकाळात हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ सेवन केल्यामुळे मधुमेह जडण्याचा धोकाही वाढतो. प्रौढ व्यक्तींनी दिवसातून सुमारे तीस ग्रॅम साखर सेवन करावी, असा सल्ला डॉक्टर देतात. चार ते सहा वर्षांच्या बालकांना दिवसातून 19 ग्रॅम आणि सात ते दहा वर्षांच्या मुलांना दिवसाकाठी 34 ग्रॅम साखर आवश्यक असते. जर गोड खाण्याची आवडच असेल आणि तरीही मधुमेहासारख्या आजारांपासून बचाव व्हावा, असे वाटत असेल तर आहारतज्ज्ञांनी सहा मार्ग सांगितले आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे शक्य नसेल तर हे सहा मार्ग अनुसरून आपण मधुमेहाला दूर ठेवू शकतो.

1. विकतचे पदार्थ कमी खा : बाहेरचे तयार पदार्थ खाल्ल्याने शरीरात सर्वाधिक साखर जाते. अशावेळी थोडी सावधगिरी बाळगली, तर गोड खाऊनसुद्धा मधुमेहापासून बचाव शक्य आहे. केवळ स्पॅगिटी सॉस आणि मायोनीजऐवजी ऑरगॅनिक योगार्ट वापरात आणावे आणि बाहेर खाण्याचा प्रसंग आलाच तर जिथे सॉस तयार केले जाते, अशा ठिकाणी खावे. घरी बनविलेल्या सॉसमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते.

2. थोडे-थोडे अधिक वेळा खा : जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल आणि शरीरातील साखरेची पातळी अचानक कमी झाल्याने त्रास होत असेल, तर चॉकलेट किंवा गोड बिस्किटे सोबत ठेवा. थोडे-थोडे अधिक वेळा खावे; परंतु मधुमेह आहे म्हणून खाणे टाळू नये. सकाळची न्याहरी, दुपारचे आणि रात्रीचे भोजन वेळेवर करण्याबरोबरच दुपारी आणि रात्री स्नॅक्स जरूर घ्यावेत. न खाता तीन तासांपेक्षा अधिक काळ राहू नये. अन्यथा रक्तातील साखरेचे प्रमाण घटून अडचणींचा सामना करावा लागेल.

3. उपवास करू नका : आहाराच्या संतुलनातून शरीरातील साखर कमी करण्याची जबाबदारी रुग्णावरच असल्याने रुग्णाने उपवास करणे टाळावे. प्रौढ पुरुषाला दिवसाकाठी 2500 कॅलरीज तर प्रौढ महिलेला 2000 कॅलरीज गरजेच्याच असतात. आहारात साखर आणि कार्बोहायड्रेट्स नाहीत, याची खात्री मात्र जरूर करावी. साखरेचे कमी किंवा अधिक प्रमाणच शरीरातील इन्शुलिनचे संतुलन बिघडण्यास कारणीभूत ठरते. याखेरीज स्ट्रेस हार्मोन्ससारखे अ‍ॅड्रिलिन आणि कोरिस्टोल संप्रेरकांचाही या संतुलनावर परिणाम होत असतो.

4. चहा-कॉफी दिवसात एकदाच : शरीरात साखरेचे प्रमाण वाढत असेल तर चहा आणि कॉफीच्या माध्यमातून जे कॅफेन शरीरात जाते, त्यावरही नियंत्रण आणण्याची वेळ आता आली आहे, हे ओळखावे. चहा-कॉफीच्या माध्यमातून शरीरात कोरिस्टोल संप्रेरके स्रवतात. त्यामुळे इन्शुलिनच्या स्रावावर विपरीत परिणाम होतो. तसे अधिक साखरेची शरीराला सवय लावण्यासही चहा-कॉफीच कारणीभूत ठरते.

5. कार्बोहायड्रेटसोबत प्रथिनेही घ्या : कार्बोहायड्रेट्स पोटात गेल्यावर त्यांचे विघटन होऊन साखरेत रूपांतर होते, हे तर सर्वजण जाणतात. परंतु त्याच प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्यास कार्बोहायड्रेट्सची साखर बनण्याची प्रक्रिया संथ आणि नियंत्रित होऊ शकते. शेंगदाण्यासारख्या पदार्थांचा आहारात अधिक समावेश करून आपण ही बाब साध्य करू शकता.

6. 'कम्फर्ट डाएट' नकोच : ताण वाढल्यानंतर गोड खाण्याने आराम मिळतो; त्यामुळे गोड जिन्नस 'कम्फर्ट फूड' म्हणून मान्यता पावले आहेत. गोड खाल्ल्यावर ताणातून मुक्ती मिळते, हे खरे; पण लोक केवळ कामाचा ताण आल्यावरच नव्हे तर बोअर झाल्यावर, एकटे असल्यावर, दुःखी अथवा क्रोधित असल्यावरही गोड खाऊन 'कम्फर्ट' मिळविण्याचा प्रयत्न करतात. परंतु मधुमेहाच्या रुग्णांना ताण कमी करण्यासाठी अन्य रस्ता शोधायला हवा आणि 'कम्फर्ट फूड'च्या नावाखाली गोड खाणे टाळायला हवे. ताण दूर करण्यासाठी अन्य कशाततरी मन रमवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT