धुळे, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचे धुळ्यात आज (बुधवार) तीव्र पडसाद उमटले. शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ शिवसैनिकांनी ईडीचा प्रतिकात्मक रावण पुतळा तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत घोषणाबाजी केली.
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सातत्याने केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात आरोप करणे सुरू केले. त्यानंतर ईडीने खासदार राऊत यांची दादर येथील मालमत्ता आणि अलिबाग येथील भूखंड जप्त केले. या कारवाईचे धुळ्यात तीव्र पडसाद उमटले . शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या समोर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, संघटक डॉ. सुशिल महाजन, महानगर प्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, जिल्हा उपप्रमुख किरण जोंधळे, भरत मोरे आदीसह शिवसैनिकांनी आंदोलन केले.
यावेळी ईडीच्या प्रतिकात्मक रावणाचा पुतळा दहन करण्यात आला. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांच्या देखील प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना हातातील बाहुले बनवले असून केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठवणाऱ्या विरुद्ध सातत्याने ईडीच्या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या हेतूने शिवसेनेच्या नेत्यांना धमकावले जात आहे. त्याचप्रमाणे केंद्राच्या या कृतीविरुद्ध शिवसेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी महेश मिस्त्री यांनी दिला.
हेही वाचलंत का ?