धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे जिल्ह्यातील 118 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजेपासून सुरुवात झाली आहे. मतमोजणीचा कल ऐकण्यासाठी तांत्रिक विद्यालयाच्या बाहेर जेल रोडवर मोठ्या प्रमाणावर समर्थकांनी गर्दी केली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यातील 14 गावातील सरपंच आणि 400 सदस्य बिनविरोध झाल्यामुळे 118 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात सरपंच पदासाठी 366 तर सदस्य पदासाठी 1796 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात दोन लाख 64 हजार 727 मतदार होते. त्यापैकी 76.59 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. धुळे तालुक्यात 30, साक्री तालुक्यात 50, शिरपूर तालुक्यात 16 तर शिंदखेडा तालुक्यात 22 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. दरम्यान आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यातील मतमोजणीचे कल येण्यास सुरुवात झाली असून साक्री तालुक्यातील कासारे ग्रामपंचायतीत शिंदे गटाचे समर्थक विशाल देसले हे विजयी झाले आहेत. तर भाडणे येथून अजय सोनवणे हे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. धुळे तालुक्यातील बोरकुंड ग्रामपंचायत बाळासाहेब भदाणे पुरस्कृत पॅनलचे सुनिता हेमंत भदाणे या विजयी झाल्या असून याच पॅनलच्या आठ जागा विजयी झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीत काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. तर नंदाळे ग्रामपंचायत काँग्रेसच्या स्वाती सतीश देसले या सरपंच पदावर विजयी झाले असून फागणे ग्रामपंचायतीत विद्या नगराज पाटील आणि सुरेखा चौधरी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गट- 2
काँग्रेस-6
इतर- 2
राष्ट्रवादी- 2
भाजप- 25
शिवसेना शिंदे गट- 7
महाविकास आघाडी 10
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व दिसून येते आहे. आतापर्यंत आलेल्या निकालात दोनही जागा भारतीय जनता पार्टीकडे गेल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील तोंदे ग्रामपंचायतीत सरपंच पदावर राहुल चौधरी तर वाघाडी ग्रामपंचायत किशोर माळी हे विजयी झाले आहेत. धुळे तालुक्यातील फागणे येथे देखील भारतीय जनता पार्टीच्या विद्या नगराज पाटील या विजयी झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा धुवा उडवला आहे.