पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : कार्तिकी एकादशी सोहळा एका दिवसावर येवून ठेपला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले भाविक लाखोंच्या संख्येने पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग, 65 एकर, भक्तीमार्ग, प्रदक्षिणा मार्ग गजबजून गेला आहे. तीन लाखावर भाविक दाखल झाले असल्याने मठ, मंदिरे, धामिर्क शाळा, संस्था, 65 एकरातील राहुट्यांमध्ये भाविक जजन, किर्तन व प्रवचनात दंग झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरीत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी यात्रा गुरुवार दि. 24 रोेजी होत आहे. आषाढी यात्रेनंतरची ही दुसरी मोठी यात्रा असल्याने या यात्रेला किमान आठ ते 10 लाख भाविक येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाकडून आवश्यक तयारीही करण्यात आलेली आहे तर आलेल्या भाविकांच्या आरोग्याची काळजीसाठी विशेष पथके निर्माण करण्यात आली आहेत.
65 एकर येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबीर आयोजित केले आहे. यामध्ये किमान 10 लाख भाविकांची मोफत आरोग्यसेवा करण्यात येणार आहे. यात्रेकरीता जादा विशेष एसटी बसेस, रेल्वे गाड्या सोडण्यात येत असल्याने भाविकांची संख्या दशमीच्या अगोदरच वाढली आहे. एसटी बसने विशेष सवलती दिल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. यांमुळे पंढरीनगरी भाविकांनी फुलली आहे.
पंढरीत आलेला भाविक प्रथम चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य देत असल्याने चंद्रभागा वाळवंटातही भाविकांची गर्दी वाढत आहे. श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी उभारण्यात आलेली दर्शन रांग पत्राशेडमधील सातव्या शेडमध्ये पोहोचली आहे. यामध्ये किमान 80 हजार भाविक उभे आहेत. आणखीन गर्दी वाढत आहे.
मंदिर समितीकडून यंदा प्रथमच कार्तिकी यात्रेत भाविकांना चार दिवस मोफत अन्नदान करण्यात येत आहे तर 65 एकर येथील भक्तीसागर येथे भाविक तंबू, राहुट्या उभारुन वास्तव्य करीत आहेत. येथेही एक लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. आज दशमीदिवशी येथील सर्व प्लॉटवर भाविक निवारा उभारतील. तेव्हा येथे किमान दोन लाखाहून अधिक भाविक वास्तव्यास असणार आहेत.
मंदिर परिसर, भक्तीमार्ग, प्रदक्षिणा मार्गावर तसेच स्टेशन रोड भाविकांनी गजबजला आहे.वाढती भाविकांची संख्या लक्षात घेता सुमारे 4500 पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्तिकी यात्रेत तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच सुरक्षाविषयक पथके, सीसीट्व्हिी कॅमेरे लक्ष ठेवून असणार आहेत.
आज बुधवार (दि. 22) दशमी तर गुरुवार (दि. 23) एकादशी आहे. भाविकांना चंद्रभागेत स्नान करता यावे म्हणून उजनी धरणातून सोडलेले पाणी मंगळवारी रात्री पंढरपुरात दाखल झाले. यामुळे भाविकांना स्नान करण्याचा आनंद घेता येणार आहे.
कार्तिकी ही जनावरांच्या बाजाराकरीता प्रसिद्ध आहे. वाखरी येथील पालखी तळावर जनावरांचा बाजार सशर्त भरवण्यात आला आहे. दोन वर्षे कोरोना व एक वर्ष लम्पिस्किन आजारामुळे जनावरांचा बाजार भरवण्यात आला नव्हता. तीन वर्षांनंतर जनावरांचा बाजार भरला आहे.