पुणे, पुढारी वृत्तसेवा: समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचली पाहिजे. यामध्ये युवा पिढी महत्वाची भूमिका बजावू शकते. देशाची अर्थव्यवस्था अधिक शक्तीशाली होण्यासाठी युवकांनी प्रयत्नशील रहावे. भ्रष्टाचाराला कोणताही थारा मिळता कामा नये आणि भष्ट्राचारी लोकांना निवडून देऊ नका असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 12 व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मनोगत व्यक्त केले.
फडणवीस म्हणाले, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचविण्याबरोबरच, देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी आणण्यासाठी युवकांनी सहभाग वाढवावा. सोशल मीडियामुळे वाढणार्या नकारात्मकतेच्या भावनेला वेळीच आवर घालून सकारात्मकता वाढीवर भर द्यावा. आपल्या देशाला मोठी परंपरा आहे आणि सभ्येतेचे प्रतिक म्हणून देशाकडे पाहिले जाते हे लक्षात घेता युवा पिढीने विकसीत आणि विश्वगुरूची संकल्पना जगासमोर पुन्हा एकदा आणावी. यामध्ये सर्वाचा सहभाग असावा.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आधुनिक विज्ञान आणि अध्यात्म याचा संगम या उपक्रमाच्या माध्यमातून झालेला आहे. हे दोन महत्वाचे घटक आहे. आणि यातूनच देशाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. युवकांनी जीवनामध्ये ध्येय समोर ठेवतांना दुर्दम्य आशावाद बाळगला पाहिजे. आज निराशजनक बाबींवर प्रकाश टाकला जातो आहे.
सुमित्रा महाजन म्हणाल्या, युवकांनी काम करतांना प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, हे लक्षात ठेऊन कार्य करावे. त्याचबरोबर वरिष्ठांबरोबर सतत संवाद ठेऊन अनुभवांची देवाण घेवाण करायला हवी.
सामाजिक समरसता संकल्पना व्यापक करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. त्याअंतर्गत महिलांचा सन्मान, सर्वांना समानतेची वागणूक अशा गोष्टींचा प्रसार केला जावा. सामान्य, अतिसामान्य नागरिकांनी इंग्रजांविरुद्ध लढ्यात सहभाग घेतल्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. भौतिक प्रगती साधतांना मानसिक विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. परिश्रम आणि विवेक एकमेकांशिवाय अर्थहीन आहेत आणि त्यासोबत स्वप्नही आवश्यक आहे. नव्या पिढीने नवे स्वप्न घेऊन समाज घडविण्यासाठी, वंचितांना त्यांचे हक्क देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांनी केले.