कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर कोल्हापूर आणि पंढरपूर तीर्थक्षेत्रांचा विकास केला जाईल. त्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली.
महानगरपालिकेतर्फे आयोजित थेट पाईपलाईनसह विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अमृत योजना दोन अंतर्गत 338 कोटींचा प्रस्ताव मार्गी लावण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
ते म्हणाले, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याबाबत शासनाची सकारात्मक भूमिका आहे. या माध्यमातून कोल्हापूरचा विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच नागपूर-गोवा शक्तिपीठ हायवे कोल्हापुरातून जाणार आहे. त्यामुळे त्याचाही फायदा कोल्हापूरला नक्कीच मिळणार आहे. विकासकामांसाठी सरकार नेहमीच कोल्हापूरच्या पाठीशी राहील. मात्र, कोणतीही तडजोड न करता दर्जेदार रस्ते आणि अन्य कामेही करावीत. ठेकेदारांना वेळेचे बंधन घालून कामे करून घेतल्यास मिळालेला निधी वेळेत पूर्ण होउन जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध होतील.
पंचगंगा प्रदूषण रोखणार
सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले. थेट पाईपलाईनसह विविध विकासकामांसाठी 634 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. कोल्हापूर शहरातील सांडपाण्याचा प्रश्न सोडवून पंचगंगा नदी प्रदूषणमूक्त करण्यासाठी 338 कोटी रुपयांच्या अमृत दोन योजनेस मंजुरी दिली आहे. यामुळे पंचगंगा प्रदूषण रोखण्यास मदत होणार असून नदीकडील गावांना स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे.
रोजंदारी आणि ठोक मानधनावरील कर्मचार्यांच्या कायम सेवेत सामावून घेण्यासंदर्भात प्रशासकांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. कर्मचार्यांना जबाबदारीची जाणीव करून दिल्यास ते कुठेही कमी पडणार नाहीत. याची ग्वाही देताना त्यांनी मुंबईतील सफाई कर्मचार्यांचे उदाहरण दिले. देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
थेट पाईपलाईनचे स्वप्न पूर्ण ः हसन मुश्रीफ
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महापालिकेच्या वतीने उद्घाटन झालेल्या विकास योजनांचा नागरिकांना लाभ होणार आहे. थेट पाईपलाईनच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरवासीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अजूनही शहरातील शंभर टक्के लोकांना याचे पाणी मिळत नाही. यासाठी निधीची आवश्यकता आहे. महापालिका प्रशासक यांनी तांत्रिक अडचणी दूर करून सर्व शहरवासीयांना मुबलक पाणी देण्यासाठी प्रयत्न करावेत. शहरातील रस्ते महापुरामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. यासाठी राज्य सरकारने 100 कोटी रुपये दिले आहेत तसेच आणखी शंभर कोटी रुपयांचा निधी दिल्यास शहरातील सर्वच रस्ते चांगले होतील.
अंबाबाई मंदिर विकासाचा 1200 कोटींचा आराखडा
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, पंचगंगा नदी प्रदूषण, अमृत योजना टप्पा 1 व 2 संदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवले. त्यानुसार पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी 338 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला आहे. अंबाबाई मंदिर दर्शनासाठी लाखो भाविक येतात. त्यामुळे भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी मंदिर परिसरातील रहिवासी, व्यापारी, व्यावसायिक यांची बैठक घेतली. त्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय मंदिराचा विकास होणार नाही. जोतिबा, नृसिंहवाडी, खिद्रापूरचा 900 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. अंबाबाई मंदिर विकासाचा 1200 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे, याचा आगामी अर्थसंकल्पात अंतर्भाव करावा, अशी मागणी पालकमंत्री यांनी केली.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना काही गावांत विरोध केल्याने प्रलंबित होती ती पूर्णत्वास आली. अंबाबाई मंदिर विकासाचा आराखडा तयार केला असून लवकरच त्याचे मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण होणार आहे. अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी तेथील शासकीय कार्यालये इतरत्र स्थलांतरित केली. जोतिबा आराखडा व पावनखिंडसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हयातील चार किल्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
प्रथमच मोठा निधी : क्षीरसागर
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, शहराच्या इतिहासात पहिल्यादांच मोठा निधी विकासकामासाठी राज्य सरकारने दिला आहे. नगरविकास व नगरोत्थानच्या माध्यमातून शहरात विविध योजना राबविल्या जात आहेत. 2019 ला थेट पाईप लाईनसाठी विधानसभेच्या बाहेर उपोषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी नगरविकासमंत्री म्हणून उपोषण सोडवले, त्यामुळेच थेट पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लागला आहे. महापालिकेतील रोजंदार आणि ठोक मानधनावरील कर्मचार्यांना सांगली व परभणी जिल्ह्याप्रमाणे कायमस्वरूपी सेवेत घ्यावे. महापालिका स्थापनेपासून कोल्हापूर शहराची एक इंचही वाढ झाली नाही. इच्छुक गावांना घेऊन हद्द वाढ करावी. क्रिडाईच्या वतीने शहरात पुनर्विकासाची कामे सुरू असून त्यांना काही अडचणी येत आहेत. पुणे व ठाणे शहराप्रमाणे 9 मीटरऐवजी 30 मीटरची मर्यादा करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, केशव जाधव, माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
लोकसभेला महायुतीच्या दोन्ही जागा निवडून आणू
देशात तीर्थक्षेत्र विकासामुळे तेथील व्यवसाय, व्यापारात 20 पटींनी वाढ झाली आहे. त्यांचा जीडीपीत वाढ होऊन अर्थव्यवस्थेत भर घातली जाणार आहे. कोल्हापूरला दक्षिण भारतातील आध्यात्मिक डेस्टिनेशन बनविण्याचे प्रयत्न राहील. मार्च महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातून महायुतीच्या दोन्ही जागा निवडून आणू. वेळ कमी असला तरी मोठ्या प्रमाणात विकासकामे करून चांगला पालकमंत्री होण्याचा प्रयत्न करू, असे पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले.
आमच्या उठावामुळेच तुम्ही पालकमंत्री
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात आपण 25 वर्षे आमदार, 19 वर्षे मंत्री म्हणून काम केले. मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळाले नाही. ती माझी खंत होती. तर तुमच्या उठावामुळे एक वर्ष माझे मंत्रिपद गेले, असे म्हणाले. याचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी आम्ही केलेल्या उठावामुळेच तुम्ही पालकमंत्री झालात, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.